अद्यावत बोटीसाठी घेतलेल्या १.९० कोटीचा अपहार करुन फसवणुक

खाजगी कंपनीच्या चार अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, – मासेमारीसाठी अद्यावत बोट बनविण्यासाठी घेतलेल्या १ कोटी ९० लाख रुपयांचा अपहार करुन एका खाजगी कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार माझगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या चार प्रमुख अधिकार्‍याविरुद्ध भायखळा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जयचंद्र सोनू, सलजाकुमारी लक्ष्मी, प्रसन्ना शिवानंदन आणि प्रदीश मेनन अशी या चौघांची नावे असून ते चौघेही एमसीएमएल कंपनीचे प्रमुख अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. लवकरच या चौघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

अजय गुलाबभाई कुंडालिया हे शिवडी येथे राहत असून एसकेएसएल कंपनीत संचालक आहे. गेल्या तीस वर्षांपासून ते श्रीकृष्णा स्टीव्हडोरेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत जहाजाने मालाची वाहतूक भारतात आणि भारताबाहेर करण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या कंपनीकडे अनेक जहाज असून ते जहाज ते भाड्याने देतात. या जहाजातून संबंधित कंपनी त्यांच्या मालाची ने-आण करतात. ऑक्टोंबर २०२२ रोजी त्यांच्या कंपनीला मासेमारीच्या वाहतुकीसाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्सोत्पादन विभागाकडून एक कंत्राट मिळाले होते. कंपनीच्या व्यवसाय वाढीसाठी त्यांना एका हायब्रीड पेट्रोल प्रकाराची अद्यावत बोटीची गरज होती. त्यासाठी ते बोट बनविणार्‍या कंपनीचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांना मार सिलोओ मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड (एमसीएमएल) कंपनीबाबत माहिती मिळाली होती. ही कंपनीत जहाज बांधनी क्षेत्रातील एक नामांकित सरकारमान्य कंपनी असून त्यांनी भारतीय नौदलासाठी अनेक जहाज बांधले आहेत. त्यांच्या कंपनीला इलेक्ट्रीक बोट बनविण्याचा चांगला अनुभव होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीने संंबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला होता. काही दिवसांनी कंपनीचे प्रमुख जयचंद्र सोनू, सलजाकुमारी, प्रसन्ना शिवानंदन आणि प्रदीप मेनन आदी अधिकारी त्यांच्या माझगाव येथील कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्यात एक अद्यावत बोट बनविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या चर्चेत कंपनीच्या चारही अधिकार्‍यांनी त्यांना १४.४९ मीटर लांबी आणि ०४.०१ मीटर रुंदीची वेग तासी २२ नॉटीकल अशी पेट्रोल बोट ३ कोटी ७ लाख ६३ हजार ३२० रुपयांमध्ये बनविण्याचे तसेच शंभर दिवसांत ती बोट पोच करण्याची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले होते. यावेळी त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात बोटीचे आगाऊ पेमेंट २० टक्के आधी देण्याचे ठरले होते. त्यानंतर टप्याटप्याने बोट तयार करताना ५० टक्के आणि इलेक्ट्रीक बांधणीवेळी उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे ठरविण्यात आले होते. कराराप्रमाणे अजय कुंडालिया यांच्या कंपनीने त्यांना टप्याटप्याने १ कोटी ९० लाख रुपयांचे पेमेंट केले होते.

ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्या कंपनीकडून एका अधिकार्‍याला दुबईला जहाजाच्या कामाच्या पाहणीसाठी पाठविण्यात आले होते. यावेळी त्यांना बोटीचे कोणतेही काम झाले नसल्याचे दिसून आले. बोटीचे काम प्रगतीपथावर असून दोन महिन्यांत बोटीचा ताबा मिळेल असे कंपनीने सांगितले होते. मात्र त्यांनी दिलेली ही माहिती खोटी होती. त्यांनी त्यांनी बोटीचे पाठविलेले फोटो बोगस होते. अशा प्रकारे एमसीएमएल कंपनीच्या चारही अधिकार्‍यांनी शंभर दिवसांत अद्यावत बोट बनवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या कंपनीकडून १ कोटी ९० लाख रुपये घेतले आणि दिलेल्या मुदतीत बोट बनवून देता कंपनीची फसवणुक केल होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच अजय कुंडालिया यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी एमसीएमएल कंपनीचे प्रमुख जयचंद्र सोनू, सलजाकुमारी लक्ष्मी, प्रसन्ना शिवानंदन आणि प्रदीश मेनन या चौघांविरुद्ध भायखळा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच चारही अधिकार्‍यांची पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page