फ्लॅटसाठी घेतलेल्या 70 लाखांचा अपहार करुन फसवणुक
एजंटसह म्हाडाच्या कथित अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे 70 लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्धाची दोघांनी फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका इस्टेट एजंटसह म्हाडा कथित अधिकार्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अविनाश संजय कुमार व अरविंद बबन लांबे अशी या दोघांची नावे असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी या दोघांनाही समन्स बजाविले जाणार असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.
62 वर्षांचे दिपक माधव तुडवेकर हे त्यांच्या पत्नीसोबत अंधेरी परिसरात राहतात. त्यांना दोन मुले असून ते स्वतंत्र राहतात. अंधेरीतील एका खाजगी कंपनीतून दिपक तर त्यांची पत्नी भारतीय जीवन विमा निगम येथून मॅनेजर म्हणून निवृत्त झाले आहेत. मुलांसाठी त्यांना एका फ्लॅटमध्य गुंतवणुक करायची होती. यावेळी त्यांच्या मेहुण्याने त्यांची ओळख अरविंद लांबेशी करुन दिली होती. अरविंद हा फ्लॅट खरेदी-विक्रीचे एजंट म्हणून काम करत होता. त्याची म्हाडामध्ये चांगली ओळख असल्याचे त्यांच्या मेहुण्याने सांगितले होते.
ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांनी अरविंदची भेट घेऊन त्याला म्हाडाच्या घराविषयी बोलणी केली होती. यावेळी अरविंदने त्याचा परिचित अविनाश हा म्हाडामध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून त्यांची म्हाडामध्ये चांगली ओळख आहे. त्यांच्याच मदतीने त्यांना म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्याने अंधेरीतील बजाज एमराल्ड सोसायटीमध्ये सहा फ्लॅट उपलब्ध असून त्यातील एक फ्लॅट 1 कोटी 70 लाखांमध्ये देण्याचे आमिष दाखविले होते. याकामी त्याने त्यांच्याकडे दोन टक्के ब्रोकरेजची मागणी केली होती. त्यांनीही त्याला होकार दर्शविला होता.
त्यांचा विश्वास बसावा म्हणून नोव्हेंबर 2023 रोजी त्याने त्यांना एमराल्ड सोसायटीचा एक फ्लॅट दाखवून तोच फ्लॅट अलोट होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांची अविनाशी ओळख करुन दिली होती. त्याने त्यांना अनंत कृष्णा भोवड यांची एक फाईल असून त्यांचा फ्लॅट त्यांच्या नावावर करुन देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅटबाबत एक एमओयू झाला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना फ्लॅटसाठी टप्याटप्याने 70 लाख रुपये दिले होते. मरिनलाईन्सच्या चंदनवाडी, सी वॉर्डमध्ये लवकरच त्यांची हेअरिंग होईल आणि नंतर त्यांच्या नावावर फ्लॅट अलोट होईल असे सांगितले.
मात्र सहा ते सात महिने उलटूनही त्यांची हेअरिंग झाली नाही. त्यामुळे त्यांनी ऑगस्ट 2024 रोजी अविनाश आणि अरविंदची भेट घेतली. फ्लॅटच्या कामात विलंब होत असेल तर त्यांना फ्लॅट नको आहे, फ्लॅटसाठी घेतलेली रक्कम परत करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही.
या दोघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अविनाश संजय कुमार आणि अरविंद लांबे यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.