वर्क होम केला नाही म्हणून तेरा वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण
घाटकोपरच्या खाजगी ट्यूशनच्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दिवाळीच्या सुट्टीत दिलेला वर्क होम केला नाही म्हणून आठवीत शिकणार्या एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच शिक्षिकेने छडीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लक्ष्मी खडका या खाजगी ट्यूशनच्या शिक्षिकेविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेले तक्रारदार त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत घाटकोपर परिसरात राहतात. त्यांची तेरा वर्षांची मुलगी याच परिसरातील एका हिंदी हायस्कूलमध्ये आठवीत शिकते. तिच्यासाठी त्यांनी घाटकोपर येथील एलबीएस रोड, गुरुनानक नगर, खडका क्लासेसमध्ये खाजगी ट्यूशन लावले होते. त्यामुळे ती लक्ष्मी खडका हिच्याकडे दुपारी दोन ते सायंकाळी चार या दरम्यान ट्यूशनसाठी जात होती. शुक्रवारी सायंकाळी तक्रारदार त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना त्यांची मुलगी रडत घरी येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने तिची चौकशी केली होती. यावेळी तिने दिवाळीच्या सुट्टीत लक्ष्मी खडका हिने तिला होम वर्क दिला होता.
होम वर्क पूर्ण न केल्याने लक्ष्मीने तिला छडीने दोन्ही हातावर जोरात मारहाण केल्याचे सांगितले. त्यामुळे तिचे दोन्ही हात लाल झाले होते. तसेच हातावर छडीने मारहाण केल्याचे वळ दिसत होते. या घटनेने संतप्त झालेल्या तक्रारदारांनी लक्ष्मीकडे जाऊन विचारणा केली होती. यावेळी तिने उडवाउडवीचे उत्तरे दिले. तसेच त्यांच्या मुलीने दिलेला वर्क होम केला नाहीतर तिला दररोज अशाच प्रकारे मारहाण करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी तिला समजविण्याचा प्रयत्न करुनही तिने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार घाटकोपर पोलिसांना सांगून खाजगी ट्यूशनच्या शिक्षिका लक्ष्मी खडका हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची तिथे उपस्थित पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लक्ष्मीची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.