सोळा वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या पित्याकडून अत्याचार
तीन वर्षांत तीन ते चार वेळा अत्याचार केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 नोव्हेंबर 2025
मुंबई, – सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन वर्षांत आरोपीने तिच्यावर तीन ते चार वेळा अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या अत्याचाराला कंटाळून ती उत्तरप्रदेशातून मुंबईत पळून आली होती, मुंबईत आल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन तिच्या वडिलांविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मुलीला मेडीकलसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोळा वर्षांची पिडीत मुलगी मूळची उत्तरप्रदेशची रहिवाशी असून ती तिथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. आरोपी तिचे वडिल आहेत. जानेवारी 2022 रोजी ती तिच्या घरी असताना तिच्या वडिलांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर घरात जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे बोलून त्यांनी तिला धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्याचाच फायदा तिच्या वडिलांनी घेतला होता.
जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत तिच्या वडिलांनी तिच्यावर तीन ते चार वेळा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. वडिलांकडून होणार्या मानसिक व शारीरिक शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे ती तिच्या घरातून पळून गेली होती. उत्तरप्रदेशातून ती अलीकडेच मुंबईत आली होती. कुर्ला येथे असताना तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश चुन्नाभट्टी पोलिसांना दिले होते.
या आदेशानंतर पिडीत मुलीच्या जबानीवरुन तिच्या वडिलांविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीला मेडीकलसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असून तिथे तिच्यावर मेडीकल केली जाणार आहे. हा गुन्हा उत्तरप्रदेशात घडल्याने त्याचा तपास तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.