स्वस्तात म्हाडाचा रुम देतो सांगून वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणुक

37 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 नोव्हेंबर 2025
मुंबई, – पवईतील म्हाडा वसाहतीत स्वस्तात म्हाडाचा रुम देतो सांगून एका वयोवृद्ध व्यावसायिकाची तीनजणांच्या टोळीने फसवणुक केल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करुणाकर पुजारी, सुनिता करुणाकर पुजारी आणि सनी जनार्दन कांबळे अशी या तिघांची नावे असून यातील पुजारी पती-पत्नी तर सनी हा म्हाडाचा तोतया अधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

62 वर्षांचे तक्रारदार रमेश रामचंद्र नागफासे हे साकिनाका परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे रमेश इलेक्ट्रॉनिक्स नावाचे एक शॉप आहे. याच परिसरात पुजारी पती-पत्नी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्या कौटुंबिक संबंध असून ते नेहमीच एकमेकांच्या घरी येत जात होते. करुणाकर हा रियल इस्टेट एजंटसह रुम रिपेरिंगचे काम करतो. चार वर्षांपूर्वी करुणाकर व त्याची पत्नी करुणा पुजारी हे दोघेही त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांच्यात गप्पा सुरु असताना त्यांनी त्यांना पवईत कुठे स्वस्तात रुम असे तर सांगा असे सांगितले होते. यावेळी या दोघांनी त्यांना पवईतील म्हाडा वसाहतीत रुम देण्याचे आश्वासन दिले होते.

म्हाडा इमारतीमध्ये काहींना रुम अलोट झाले आहे, मात्र त्यांनी अलोटमेंट रक्कम न भरल्याने त्यांचे अलोटमेंट रद्द झाले आहेत. त्यामुळे या इमारतीमध्ये काही रुम खाली आहेत. त्यापैकी एक रुम देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी या दोघांनी त्यांचे म्हाडामधील काही वरिष्ठ अधिकार्‍यांशी ओळख असल्याची बतावणी करुन त्यांना स्वस्तात रुम देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी त्यांनी त्यांना रामबाग रोड, म्हाडा इमारतीमध्ये आणले होते. तिथे तीन ते चार रुम खाली असल्याचे सांगून त्यातील एक रुम दाखवून त्यांना तीच रुम देतो असे सांगितले. चर्चेअंती त्यांच्यात रुमच्या खरेदी-विक्रीचा 85 लाखांमध्ये सौदा झाला होता.

ठरल्याप्रमाणे पुजारी पती-पत्नीने त्यांच्याकडे काही रक्कम आगाऊ देण्याची विनंती केली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना टप्याटप्याने 37 लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांना म्हाडाची पावती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर आणखीन विश्वास बसला होता. याच दरम्यान त्यांनी त्यांची ओळख सनी कांबळेशी करुन देताना तो म्हाडाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. मात्र ठरलेल्या वेळेत त्यांनी म्हाडाच्या रुमचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते.

हा प्रकार संशयास्पद वाटताच ते स्वत वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी करुणाकर पुजारीने दिलेल्या म्हाडाची पावती, डिमांड ड्राफ्ट दाखविले होते. ते पाहून संबंधित अधिकार्‍यांनी त्यांनी दाखविलेले सर्व पावत्या आणि डिमांड ड्राफ्ट बोगस असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यालयातून पवईतील म्हाडा इमारतीत त्यांना कुठलेही रुम अलोट झाले नाही. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली हेती.

यावेळी या तिघांनी पैसे देण्यास नकार दिला, उलट त्यांना पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना संपविण्याची भाषा केली होती. सतत पैशांची मागणी होत असल्याने सनी कांबळे यांनी त्यांना तीन धनादेश दिले होते, मात्र ते तिन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच रमेश नागफासे यांनी घडलेला प्रकार साकिनाका पोलिसांना सांगून तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी करुणाकर पुजारी, सुनिता पुजारी आणि सनी कांबळे या तिघांविरुद्ध म्हाडाचे बोगस दस्तावेज बनवून घरासाठी घेतलेल्या 37 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत तिघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page