प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
इतर तरुणींशी अफेसर करुन मानसिक शोषण केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 नोव्हेंबर 2025
मुंबई, – घाटकोपर येथे राहणार्या एका 26 वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर अली शेख याच्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रितीका रोहित चौहाण असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून अलीने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आईने तक्रार अर्जात केला आहे. अलीने इतर तरुणीशी अफेसर करुन रितीकाचा आर्थिक फसवणुक करुन मानसिक शोषण केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.
ही घटना गुरुवार 6 नोव्हेंबरला घाटकोपर येथील गोळीबार रोड, इंदिरानगर-एक, त्रिमूर्ती सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या 421 मध्ये कल्पना रोहित चौहाण ही महिला राहत असून ती पवईतील सेल एशिया पेट्रोल पंपावर कामावर आहे. रितिका ही तिची मुलगी असून ती अंधेरतील ईस्टर्न फार्मा कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून पर्चेस विभागात कामाला होती. तिथे तिला चांगला पगार होता, तिच्या कामात ती समाधानी होती, तरीही सहा महिन्यांपूर्वी तिने तिच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. राजीनाम्याबाबत वारंवार विचारणा करुनही तिने त्याविषयी तिच्या आईला काहीही सांगितले नव्हते.
नोकरी गेल्यानंतर तिची मानसिक स्थिती ठिक नव्हती. ती सतत कुठल्या तरी दडपणाखाली असल्याचे दिसत होती. याच दरम्यान तिला विक्रोळी येथे नवीन नोकरी मिळाली होती. अंधेरी येथे कामाला असताना तिची अली शेख या तरुणाशी ओळख झाली होती. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. अनेकदा ती अलीसोबत बाहेर फिरायला जात होती. याच दरम्यान तिला अलीचे इतर काही तरुणीसोबत अफेसर असल्याची माहिती समजली होती. या माहितीनंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तो तिच्याकडे बाईकसह इतर कारणासाठी पैशांची मागणी करत होता. त्याच्यावर प्रेम असल्याने तिनेही त्याला अनेकदा आर्थिक मदत केली होती.
मात्र इतर तरुणींसोबत अफेसरबाबत विचारणा केल्यानंतर तो तिच्याशी वाद घालत होता. तिचा मानसिक शोषण करत होता. त्याच्या या शोषणाला कंटाळून तिने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले होते. तरीही तो तिचा विक्रोळीतील कामावर येऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. तिला ब्लॅकमेल करुन तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. त्याला ती प्रचंड कंटाळून गेली होती. त्यातून तिला मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने तिच्या राहत्या घरातील पोटमाळ्यावर गुरुवारी 6 नोव्हेंबरला सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तिच्या पर्समध्ये कल्पना चौहाण हिला एक पत्र मिळाले होते. या पत्रावरुन अलीने तिला खोट्या प्रेमात फसवून तिचा मानसिक शोषण केला, सतत पैशांची मागणी करुन तिची आर्थिक फसवणुक केली होती. त्याच्याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे कल्पना चौहाण हिने घाटकोपर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अली शेख याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी रितीकीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.