मिलिटरीमधून निवृत्त झालेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
पंधरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मिलिटरीमधून निवृत्त झालेल्या एका 59 वर्षांच्या व्यक्तीविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर एका पंधरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोटात दुखत असल्याने सायन हॉसिपटलमध्ये आणल्यानंतर ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत आरोपी अटकेत असून अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
37 वर्षांची तक्रारदार महिला ही चेंबूर परिसरात राहत असून ती हाऊसकिपिंगचे काम करते. पंधरा वर्षांची पिडीत ही तिची मुलगी आहे. शनिवारी तिच्या मुलीचा पोटात प्रचंड दुखत होते. त्यामुळे ती तिला घेऊन सायन हॉस्पिटलमध्ये आली होती. तिथेच तिची मेडीकल चेकअप करण्यात आले होते. मेडीकलनंतर डॉक्टरांनी तक्रारदार महिलेला तिची मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने तिची चौकशी केली होती. यावेळी तिने तिच्या शेजारी राहणार्या रिटायर्ड मिलिटरीवाल्या अंकलने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केल्याचे सांगितले. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगितले होते.
1 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत हा प्रकार घडला होता. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र गेल्या काही दिवसांत तिच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. प्राथमिक औषधोपचार करुनही तिच्या पोटातील दुखणे बंद झाले नाही. त्यामुळे ती तिच्यासोबत सायन हॉस्पिटलमध्ये आली होती. मेडीकलनंतर ती गरोदर असल्याचे समजताच हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर ती तिच्या मुलीसोबत आरसीएफ पोलीस ठाण्यात आली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून मेडीकल होणार आहे. पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. आरोपी आणि पिडीत एकाच इमारतीमध्ये राहतात तर आरोपी मिलिटरीमधून निवृत्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले.