शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांना 25 लाखांना गंडा
विरा ट्रेडर्सच्या मालकाविरुद्ध दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 नोव्हेंबर 2025
मुंबई, – चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करुन दोन रिक्षाचालकांची सुमारे 25 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी विरा ट्रेडर्सचे मालक राकेश गंगाराम मोहिते आणि विरेंद्र धिवार यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
42 वर्षांचे राजू वसंत साळवे हे रिक्षाचालक असून ते विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहतात. जून 2023 रोजी त्याची राकेश आणि विरेंद्रशी ओळख झाली होती. या दोघांची ओळख त्याला त्याच्या एका मित्राने करुन दिली होती. ते दोघेही विरा ट्रेडर्सचे मालक असून त्यांनी त्याला शेअरमार्केटसह इतर योजनांची माहिती दिली होती. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांच्या कंपनीकडे सेबीचे अधिकृत रजिस्टर प्रमाणपत्र असल्याचे दाखवून त्यांनी आतापर्यंत अनेकांना शेअरमधील गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळवून दिल्याचा दावा केला होता.
त्यांच्या या आमिषाला बळी पडून राजू साळवे याने त्याच्या आईच्या घराची विक्री करुन त्यातून आलेली साडेसोळा लाखांची रक्कम राकेश मोहिते आणि विरेंद्र धिवार यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. याबाबत त्यांच्यात कायदेशीर करार झाला होता. जानेवारी ते एप्रिल 2024 या कालावधीत त्यांनी काही रक्कम परत करुन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर त्यांनी परताव्याची रक्कम देणे बंद केली होती. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. ऑक्टोंबरपर्यंत मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही.
दुसर्या घटनेत मंगेश ज्ञानू माने या रिक्षाचालकालाही अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला. मंगेश हा विक्रोळी येथे राहत असून रिक्षाचालक आहे. जून ते मार्च 2024 या कालावधीत त्याच्यासह त्याचे नातेवाईक विनोद लाजरस कांबळे, अमीत ज्ञानू माने, प्रकाश निवृत्ती मोहिते यांनी त्यांच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी 8 लाख 70 हजाराची रक्कम दिली होती. काही महिने परताव्याची रक्कम दिल्यानंतर त्यांनाही पैसे देणे बंद करण्यात आले होते. नोव्हेंबर 2024 रोजी राजू साळवे, मंगेश माने हे त्यांच्या विरा ट्रेडर्स कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना त्यांचे कार्यालय बंद असल्याचे दिसून आले.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने या दोघांनी पाचजणांची सुमारे 25 लाखांची फसवणुक करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पार्कसाईट पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत ते दोघेही पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आतापर्यंतच्या तपासात या दोघांनी अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली आहे. याबाबत काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले असून त्याची शहानिशा सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.