एसटी महामंडळाच्या 21 लाखांचा अपहार करुन फसवणुक

दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या वरिष्ठ लिपीकाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 नोव्हेंबर 2025
मुंबई, – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात वरिष्ठ लिपीक म्हणून काम करताना आपल्या पदाचा गैरवापर करुन आयकर विभागाच्या सुमारे 21 लाखांचा दुरुपयोग करुन अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या एका मुख्य वॉण्टेड आरोपीस नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश कैलास पवार असे या 33 वर्षीय निलंबित वरिष्ठ लिपीकाचे नाव असून तो मूळचा प्रथमेश हा कल्याणच्या खडकपाड्याचा रहिवाशी आहे. युझर आयडी आणि पासवर्डचा दुरुपयोग करुन प्रथमेश आयकर विभागाची रक्कम चौदा ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे वळती करुन एसटी महामंडळाची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो गेल्या दिड वर्षांपासून फरार होता, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अमोल बाळासो शेलार हे आग्रीपाडा परिसरात राहत असून गेल्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून काम करत करत होते. याच कार्यालयातून सर्व करांचे लेखापरिक्षण करुन नोंदणी, विधी व कर स्थापत्य आणि अंदाज या खात्याचे आयकर भरण्याचे कामकाज सर्व शाखांकडून ऑनलाईन केले जाते. त्यासाठी एसटीच्या स्टेट बँकेत एकत्रित रक्कम जमा करुन नंतर सबंधित कराची रक्कम भरली जाते. 2018 साली तिथे प्रथमेश पवार हा वरिष्ठ लिपीक सेवा या पदावर रुजू झाला होता. त्याच्यावर बाहेरील ठेकेदाराचे बिल बनवून पुढे पाठविणे, संर्किण शाखेच्या आयकराचे काम पाहण्याची जबाबदारी होती. त्यासाठी त्याला बँकेचे युझर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला होता. त्याच्या मदतीने तो विविध आयकराची रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करत होता.

जून 2024 रोजी प्रथमेशने आजारी असल्याचे कारण सांगून कामावर येणे बंद केले होते. तो कामावर येत नसल्याने त्याचे युझर आयडीचे ओटीपीची गरज असल्याने त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे आयकर भरण्याचे काम प्रलंबित राहिले होते. शेवटी अमोल शेलार यांनी त्याचा युझर आयडी बदलून घेतला होता. त्यानंतर त्याने केलेल्या ऑनलाईन व्यवहाराची माहिती घेताना त्यांना 8 मे ते 18 जून 2024 या कालावधीदरम्यान चौदा वेगवेगळे ऑनलाईन व्यवहार दिसले होते. त्यात 21 लाख 80 हजार 401 रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती.

या व्यवहाराबाबत संशय निर्माण झाल्याने अमोल शेलार यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. त्यात प्रथमेशने वरिष्ठ लिपीक पदाचा गैरवापर करुन त्याला बँकेच्या दिलेल्या युझर आयडी आणि पासवर्डचा दुरुपयोग केल्याचे उघडकीस आले. त्याने एसटी महामंडळाची आयकर भरण्यासाठी दिलेल्या रक्कम परस्पर दुसर्‍या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच अमोल शेलार यांनी वरिष्ठांना ही माहिती सांगितली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात एसटी महामंडळाच्या वतीने प्रथमेश पवार याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 406, 408, 417, 418 भादवी सहकलम 66 (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या एक ते दिड वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला प्रथमेश हा सायन येथील आंबेडकर रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून त्याला अटक केली.

चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात प्रथमेशने फसवणुकीची रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचे बोलले जाते. त्याला शेअरमध्ये गुंतवणुक करण्याची सवय होती, त्यासाठी त्याने कार्यालयातील काही कर्मचार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उसने घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध लवकरच आरोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page