40 वर्षांच्या डिलीव्हरी बॉयववर अल्पवयीन मुलाकडून हल्ला
तलवारीसह हेल्मेट आणि बांबूने केला प्राणघातक हल्ला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 नोव्हेंबर 2025
मुंबई, – डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणार्या एका 40 वर्षांच्या व्यक्तीवर एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने तलवारीसह हेल्मेट आणि बांबूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात संदेश हरिश्चंद्र कनेरी हे जखमी झाले होते, त्यांच्यावर अग्रवाल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी तेरा वर्षांच्या मुलाविरुद्ध भांडुप पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला ताब्यात घेतल्यानंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता भांडुप येथील व्हिलेज रोड, सिद्धीविनायक वडापाव सेंटरजवळ घडली. संदेश कनेरी हा भाटिया हॉस्पिटलजवळील रत्नदिप कॉलनीत राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता तो सिद्धीविनायक वडापाव सेंटरजवळ वडापाव खात होता. यावेळी संदेश तिथे उभे असल्याचे कारण पुढे करुन काहीही कारण नसताना तिथे आरोपी मुलगा आला आणि त्याने त्याला शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याच्यावर तलवारीसह हेल्मेट आणि बांबूने प्राणघातक हल्ला केला होता.
त्यात त्याच्या डोक्याला, हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे जखमी झालेल्या संदेशला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संदेशच्या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.