पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
पैशांसाठी अरबी माणसाला विक्रीसह जिवे मारण्याची धमकी दिली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 नोव्हेंबर 2025
मुंबई, – पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मोहम्मद इम्रान मोहम्मद दाऊद शेख या 34 वर्षांच्या आरोपी पतीला जे. जे मार्ग पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वादासह पैशांसाठी मोहम्मद इम्रानने त्याची पत्नी मेहक मोहम्मद इम्रान शेख (26) हिचा मानसिक व शारीरिक शोषण केला, तिला अरबी माणसाला विक्रीसह जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
61 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार शरफुद्दीन चाँद उस्मानी हे नवी मुंबईतील तळोजा, सेक्टर दोनमध्ये राहतात. त्यांना दोन मुले आणि चार मुली असून चारही मुलींचे लग्न झाले आहेत. त्यांचे दोन्ही मुले त्यांच्या कुटुंबियांसोबत उलवे येथे राहतात. मेहक ही त्यांची लहान मुलगी असून सप्टेंबर 2019 रोजी तिचे मोहम्मद इम्रानशी लग्न झाले होते. लग्नाच्या तेराव्या दिवशी मोहम्मद इम्रानची बहिण आयेशा शेखने तिच्या हातावर गरम तेल टाकले होते. त्यात तिचा हात गंभीररीत्या भाजला होता. चुकून तेल पडल्याचे सांगून आयेशाने तिची माफी मागितली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार केली नव्हती. दोन महिन्यानंतर नेरळ येथे असताना किरकोळ वादातून तिने तिचा गळा आवळला होता. मात्र त्यावेळेसही त्यांनी प्रकरण वाढविले नव्हते.
लॉकडाऊनमध्ये मेहक आणि मोहम्मद इम्रान हे त्यांच्या घरी राहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना मोहम्मद इम्रान हा क्षुल्लक कौटुंबिक वादातून मेहकशी सतत वाद घालत होता. तिला मारहाण करत होता. मे 2022 रोजी मेहक ही पाच महिन्यांची होती. यावेळी जेवण बनविण्यावरुन मोहम्मद इम्रान आणि त्याची दुसरी बहिण आलियाने तिला मारहाण करुन तिच्या पोटात जोरात लाथ मारली होती. तिला भिंतीवर जोरात ढकळले होते. त्यात तिला पुन्हा दुखापत झाली होती. हा सर्व प्रकार तिने तिचे वडिल शरफुद्दीन उस्मानी यांना सांगितला होता. यावेळी त्यांच्या परिचितांनी मेहकला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन तिच्यावर प्राथमिक औषधोपचार केले होते. त्यानंतर मेहकला मुलगी झाली म्हणून शेख कुटुंबिय तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होते.
तिच्याकडे पैशांची मागणी करत होते. तिने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्यास तिला मारहाण केली जात होती. पैसे आणले नाहीतर तिला गायब करु, अरबी माणसाला विकण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देत होते. पैशांवरुन सुरु असलेल्या छळाला मेहक ही मानसिक तणावात होता. पतीच कोणत्या तरी अरबी माणसांना विक्रीची भाषा करत असल्याने तिला प्रचंड नैराश्य आले होते. तिला होणारा त्रास, जिवे मारण्याची धमकी, विक्री करण्याची, गायब करण्याची दिलेल्या धमकीचा तिने व्हाईस रेकॉडिंग केले होते. ते रेकॉडिंग तिने तिच्या वडिलांना पाठविले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांची एक बैठक झाली होती. त्यात घडलेला सर्व प्रकार सांगून पुढे काय करायचे याबाबत चर्चा झाली होती. यावेळी मेहक आणि मोहम्मद इम्रानने त्यांना काही दिवसांचा वेळ हवा आहे असे सांगून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या बैठकीनंतर तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता.
7 नोव्हेंबरला मेहक ही त्यांच्या घरी आली होती. दुसर्या दिवशी घरातून ती कामावर निघून गेली. रात्री ती तिच्या घरी गेली होती. रात्री उशिरा तिने तिच्या नातेवाईकांना एक व्हिडीओ पाठविला होता. त्यात ती आत्महत्या करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिचे नातेवाईक तिथे गेले होते. मात्र त्यापूर्वीच मेहकने तिच्या सासरच्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कौटुंबिक तसेच पैशांवरुन होणार्या छळाला आपण कंटाळून गेलो आहे, त्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेत आहे. मला माफ करा असे तिने तिच्या आईला फोनवरुन सांगितले होते. या घटनेनंतर तिचे कुटुंबिय तिच्या घरी आले होते. मेहकला जवळच्या जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जे. जे मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी शरफुद्दीन उस्मानी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्यांनी त्यांची मुलगी मेहक हिचा तिच्या पतीने वेगवेगळ्या कारणासाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. तसेच त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी पती मोहम्मद इम्रान शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी कौटुंबिक तसेच आर्थिक वादातून मेहकचा छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.