अटकेची भीती दाखवून 79 वर्षांच्या वयोवृद्धाची फसवणुक

दिल्लीतील तोतया पोलिसांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मनी लॉड्रिंगसह अन्य एका गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका 79 वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे नऊ लाखांची फसवणुक केल्याची घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्लीतील अज्ञात तोतया पोलिसांविरुद्ध चारकोप पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

अजित हिरासिंग रघुवंशी हे 79 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत कांदिवलीतील चारकोप परिसरात राहतात. ते दोघेही सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या पेंशनवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 3 ऑक्टोंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. गुपेशकुमार नाव सांगणार्‍या या व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचे सिमकार्ड दोन तासांत बंद होणार आहे. त्यांच्या नावाने घेतलेल्या सिमकार्डवरुन फसवणुक होत असून त्यांच्या सिमकार्डवरुन संबंधित व्यक्ती अनेकांकडून पैशांची मागणी करत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. काही वेळानंतर त्यांना संबंधित व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. त्याने तो दिल्ली पोलिसांमधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरु आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत याबाबत कोणालाही काहीही सांगू नका असे सांगितले. त्यानंतर त्याने मोहम्मद नवाब मलिक यांना तुम्ही ओळखता का? अशी विचारणा केली, त्यांनी नकार देताच त्याने त्यांच्या बँक खात्यात मनी लॉड्रिंगची दोन कोटीची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल होणार असून या गुन्ह्यांत अटक होणार असल्याची धमकी दिली होती. त्यांचे बँक अकाऊंट फ्रिज होणार असल्याचे सांगून त्याने त्यांची सलग दोन दिवस चौकशी केली होती.

त्यांना पोलीस उपायुक्त राजीवकुमारशी बोलण्यास भाग पाडले होते. त्यानेही त्यांना पोलीस असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडील बँक खात्याची माहिती काढून, केस बंद करण्यासाठी त्याने त्यांना वेगवेगळ्या बॅक खात्यात पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले होते. ही रक्कम चौकशीनंतर त्यांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कुठलीही शहानिशा न करता त्याने दिलेल्या बँक खात्यात त्यांच्या बँक खात्यासह म्युचअल फंडाची सुमारे नऊ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र नंतर त्यांची चौकशी झाली नाही. त्याने त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात परत पाठविले नाही. त्यांनी संबंधित तोतया पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी एनसीसीआरबी पोर्टलसह चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक करणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page