अंधेरीतील खाजगी कंपनीतील 90 कोटीचा आर्थिक घोटाळा उघडकीस
चार मुख्य आरोपींसह कंपनीच्या पदाधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 नोव्हेंबर 2025
मुंबई, – अंधेरीतील प्रोव्होग इंडिया लिमिटेड या खाजगी कंपनीतील सुमारे 90 कोटीचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून याप्रकरणी चार मुख्य आरोपीसह एका खाजगी कंपनीच्या संचालक आणि पदाधिकार्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमीत हनुमानप्रसाद गुप्ता, समीर नंदकिशोर खंडेलवाल, राकेश धनश्याम रावत, अर्पित खंडेलवाल व त्याची कंपनी प्ल्युटस इनवेस्टमेंट अॅण्ड होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक व पदाधिकारी आदींचा समावेश आहे. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यासाठी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
निखील अनुपेंद्र चतुर्वेदी हे व्यावसायिक असून सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहतात. 1994 साली त्यांनी अॅक्मे क्लोथिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीी स्थापना केली होती. मार्च 2005 साली या कंपनीचे नाव बदलून प्रोव्होग इंडिया लिमिटेड करण्यात आले होते. याच कंपनीत निखील चतुर्वेदी हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत होते. कंपनीचे मुख्य शेअर होल्डर असल्याने कंपनीने घेतलेल्या सर्व बँक लोनसाठी त्यांची गँरटी देण्यात आली होती. लिक्वीवेडन ई-ऑशननंतर या कंपनीला प्ल्युटस इनवेस्टमेंट अॅण्ड होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विकत घेतले होते. त्यापूर्वी कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील फन रिपब्लिक सिनेमागृहाजवळील ड्रिम स्केअर इमारतीमध्ये होते.
2014 रोजी कंपनीच्या दमण येथील कारखान्यात भीषण आग लागली होती. त्यात कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच आर्थिक अडचणीमुळे कंपनीचे बँकेचे लोन अकाऊंट एनपीए झाले होते. त्यामुळे बँकेने कंपनीविरुद्ध आयबसी कायद्यानुसार एनसीएलटीमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर कंपनीवर अमीत गुप्ता यांची एनसीएलटी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2023 साली लिक्वीडेशन प्रोसेस पूर्ण करुन कंपनीची विक्री झाली होती. मात्र कंपनीची विक्री होऊन कर्जाची परतफेड झाली नव्हती, त्यामुळे त्यांची वैयक्तिक गँरटी रिलीज करण्यात आली नव्हती.
याच दरम्यान त्यांनी कंपनीच्या सर्व आयात-निर्यात व्यवसाय आणि आरपीच्या नियंत्रणासाठी असलेल्या कंपनीच्या रिटेशन बँक खात्याची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना कंपनीच्या पूर्व निर्यातदाराकडून मालाची कोट्यवधी रुपयांची रक्कम बाकी होती. 2019 ते 201ृ23 या तीन कालावधीत काही नवीन संशयास्पद एक्सपोर्ट व्यवसाय करण्यात आले होते. अमीत गुप्ता यांनी रेसॉल्युशन व लिक्वीडेशन प्रोसेसमध्ये वाजवी कारणाशिवाय विदेशात नवीन सभासदांना माल एक्सपोर्ट केलाद होता. त्यांच्याकडून कंपनीला 32 कोटी 71 लाख रुपये येणे बाकी होते. या पैशांचा त्यांनी परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती.
2018 ते 2023 या कालावधीत कंपनीचे सर्व अधिकारी अमीत गुप्ता यांच्याकडे होते. यावेळी त्यांनी कंपनीचे माजी संचालक समीर खंडेलवाल, राकेश रावत यांच्या मदतीने निखील चतुर्वेदी यांना अंधारात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला होता. ई लिलावात कंपनीची शंभर टक्के मालकीची सबसिडी इलिट टिम हाँगकाँग कंपनीची विक्री झाली होती. या कंपनीची 54 कोटी 72 लाख रुपये मूळ किंमत होती. तसेच कंपनीचे हाँगकाँग येथे दोन स्थावर मालमत्ता होत्या. या प्रॉपटी प्ल्युटस इनवेस्टमेंट अॅण्ड होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विकत घेताना संबंधित आरोपींनी कंपनीचे वास्तविक मूल्य कमी केले.
कंपनीचे स्थावर मालमत्तेचे मूल्याकन न करता कंपनीची माहिती लपवून ठेवली होती. जेणेकरुन कंपनीची प्रॉपटी कमी किंमतीत विक्री करुन आर्थिक लाभ प्राप्त केला होता. तसेच जाणूनबुजून त्यांच्या कंपनीच्या लिलाव प्रक्रियेला दोन वर्ष विलंब केला होता. जेणेकरुन कंपनीचे मूल्य अजून कमी होईल आणि त्यांची कंपनी विकत घेणार्या कंपनीला जास्त फायदा होईल असे या आरोपीचा कट होता. अशा प्रकारे अमीत गुप्ता याने इतर माजी संचालकासह प्ल्युटस इनवेस्टमेंट अॅण्ड होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक, कंपनीचे संचालक व पदाधिकार्यांच्या मदतीने निखील चतुर्वेदी यांच्या कंपनीची सुमारे 90 कोटीची आर्थिक फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित आरोपींनी कंपनीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आंबोली पोलिसांनी अमीत गुप्ता, समीर खंडेलवाल, राकेश रावत, अर्पित खंडेलवाल व त्यांच्या कंपनीच्या संचालकासह पदाधिकार्याविरुद्ध कट रचून कंपनीची 90 कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून सर्व आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.