चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची पतीकडून दगडाने ठेचून हत्या
हत्येनंतर आरोपी पतीचे पोलीस ठाण्यात स्वतहून आत्मसमर्पण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 नोव्हेंबर 2025
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन मुमताज सिराज नाईक या 52 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपी पती सिराज अहमद आदम नाईक याने पोलीस ठाण्यात स्वतहून आत्मसमर्पण करुन पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी सिराज नाईकला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिराज हा त्याच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहत होता. त्याचे मुमताजसोबत प्रेमविवाह झाला होता. तो तिच्या चारित्र्यावर सतत सशय घेत होता. याच कारणावरुन त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यात याच कारणावरुन शाब्दिक वाद झाला होता. या वादानंतर त्याने रागाच्या भरात मुमताजची दगडाने ठेचून हत्या केली होती. काही वेळ तो घरात बसून होता. सकाळी तो मालवणी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने त्याची पत्नी मुमताज हिची चारित्र्याच्या संयशावरुन हत्या केल्याची कबुली दिली. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
रक्तबंबाळ झालेल्या मुमताजला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी सिराज नाईक याच्याविरुद्घ हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.