मनी लॉड्रिंग फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

अटकेची भीतीने वयोवृद्ध महिलेला 25 लाखांना गंडा घातला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत एका 65 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह तिच्या मुलाला अटकेची भीती दाखवून तिची सुमारे 25 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस सोलापूर येथून उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सुनिल काशिनाथ भुजबळ असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत लाछेन शैर्पा आणि भिमबहादूर प्रधान या दोन नेपाळी नागरिकासह रमेशकुमार अभिमन्यू या आरोपीस पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर सुनिल भुजबळ याला पोलिसांनी अटक केली तर रवि चौहाण, नवज्योत सिमी या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अनुश्री अशोक पांचाळ ही 65 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार मालाडच्या शांताराम तलाव, ग्रीन पॉईट अपार्टमेंटमध्ये राहते. 15 जानेवारीला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला रवि चौहाण नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगून तिचे सिमकार्ड दोन तासांत बंद होणार आहे. तिच्या दस्तावेजाच्या मदतीने दिल्लीतील वेगवेगळ्या बँकेत खाती उघडण्यात आले असून त्यात मनी लॉड्रिंगची कोट्यवधी रुपयांची रक्कम ट्रान्स्फर झाली आहे. याबाबत तिच्याविरुद्ध आतापर्यंत तीस तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरु असून लवकरच तिची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला गुपेश कुमार नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो दिल्ली पोलीस विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती देताना तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाले आहे.

तिचे बँक खाती फ्रिज होणार असल्याचे वॉरंट काढल्याची माहिती दिली. त्यानंतर तिची सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या सिमी नवज्योतने चौकशी केली होती. यावेळी अनुश्री पांचाळ हिने तिचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगून तिने तिची चौकशी सुरुच ठेवली होती. या गुन्ह्यांत तिच्यासह तिच्या मुलाला अटक होणार असल्याची भीती दाखविली होती. त्यानंतर तिच्याकडून तिच्या बँक खात्याची माहिती काढून बँकेतील सर्व रक्कम दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते.

कारवाईच्या भीतीने तिने तिची एचडी तोडून सुमारे 25 लाख रुपये तिने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान त्यांनी तिला चौकशी पूर्ण होईपर्यंत हा प्रकार कोणालाही सांगू नका. चौकशी पूर्ण होताच तिच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर होईल असे सांगितले. हा प्रकार तिने तिच्या मुलाला सांगितला. त्याने तिची फसवणुक झाल्याचे सांगून पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने कुरार पोलिसांसह उत्तर सायबर विभाग आणि सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी बोगस दस्तावेजाच्या आधारे तोतयागिरी करुन फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच लाछेन शैर्या, भिमबहादूर प्रधान आणि रमेशकुमार अभिमन्यू या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. त्यांच्या चौकशीत सुनिल भुजबळ याच्यासह इतर आरोपींची नावे समोर आले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, पोलीस उपनिरीक्षक रोहन अहिरे, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, इम्रान मुलांनी यांनी सोलापूर येथून सुनिलला ताब्यात घेतले होते.

तपासात सुनिल हा मूळचा पुण्याच्या भोराडेवाडीचा रहिवाशी आहे. सध्या तो सोलापूर येथील करमाळा, विहाळ परिसरात राहत होता तर मोहोळ परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याला त्याच्या कार्यालयातूनच पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुनिल हा काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page