लोको पायलट म्हणून निवृत्त झालेल्या वयोवृद्धाची हत्या
चोरीच्या उद्देशाने हल्ला करणार्या तरुणाची चौकशी सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 नोव्हेंबर 2025
मुंबई, – लोको पायलट म्हणून निवृत्त झालेल्या सुरेंद्र धोंडूराम पाचाडकर या 65 वर्षांच्या व्यक्तीची लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करुन हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून अमन वर्मा नावाच्या एका संशयित आरोपी तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चोरीच्या उद्देशाने त्यानेच सुरेंद्रची हत्या केल्याचे बोलले जाते. या तरुणाची चौकशी सुरु असून त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास घाटकोपर येथील एलबीएस मार्ग, सीजीएस कॉलनीत घडली. कृष्णांत प्रकाश माने हे कामोठे परिसरात राहत असून सध्या घाटकोपर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री त्यांना घाटकोपर येथील झायनोव्हा हॉस्पिटलमधून एका जखमी व्यक्तीला दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे ते त्यांच्या सहकार्यासोबत हॉस्पिटलला गेले होते. या व्यक्तीवर तिथे उपचार सुरु होते, उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. चौकशीदरम्यान मृत व्यक्तीचे नाव सुरेंद्र पाचाडकर असल्याचे उघडकीस आले.
सुरेंद्र हे विक्रोळीतील आनंदनगर, त्रिवेणी सोसायटीच्या रुम क्रमांक दहामध्ये राहत होते. त्यांचा आकाश अरुण साठे नावाचा एक सावत्र मुलगा आहे. त्याच्या चौकशीत सुरेंद्र हे त्याचे सावत्र वडिल असून ते लोको पायलट म्हणून निवृत्त झाले होते. त्यांना मधुमेह आणि किडनीचा आजार होता. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी जास्तीत जास्त चालण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते नियमित साडेसात ते साडेनऊ या वेळेत विक्रोळी-घाटकोपर असे पायी चालत जात होते. गुरुवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे घरातून निघून गेले होते. रात्री पावणेदहा वाजता त्याला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन त्यांच्या वडिलांवर कोणीतरी हल्ला केला आहे.
ते रक्तबंबाळ झाले असून तुम्ही तातडीने सीजीएस कॉलनीजवळ या असे सांगितले. त्यानंतर अरुण साठे हा त्याच्या आईसोबत तिथे गेला होता. त्यांनी सुरेंद्र यांना तातडीने झायनोव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथे उपचार सुरु असताना रात्री सव्वाबारा वाजता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता.
तपासात साडेनऊ वाजता सुरेंद्र यांचे एका तरुणाशी वाद झाला होता. यावेळी त्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आरोपी तरुण पळून गेला होता. तपासात ही माहिती उघडकीस येताच पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन शुक्रवारी पोलिसांनी अमन वर्मा या आरोपी तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच सुरेंद्रवर हल्ला केल्याचे उघडकीस आले होते. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.