मित्रांना पार्टी देण्यासाठी चोरी करणार्या आरोपीस अटक
कॅश चोरी करणारा रेस्ट्रारंटचा कर्मचारी निघाल्याने खळबळ
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 नोव्हेंबर 2025
मुंबई, – तीन दिवसांपूर्वी खार येथील बँग रेस्ट्रॉरंटमध्ये झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी शहानवाज वसीम शेख या आरोपी कर्मचार्याला खार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कॅश चोरी करणारा रेस्ट्रॉरंटचा कर्मचारी निघाल्याने तिथे काम करणार्या कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. स्पॅनिश कथेवरुन त्याने चोरी करताना उडी आणि मास्क लावून ही चोरी केली, मात्र मुंब्रा येथे गेल्याने त्याने उडी आणि मास्क काढले आणि त्याची ओळख पटली. त्यानंतर त्याला पोलिसांनी चोरीच्या काही मुद्देमालासह शिताफीने अटक केली.
योगेश गणेश उसाकोयल हा जोगेश्वरी येथे राहत असून खार येथील बँग रेस्ट्रॉरंटमध्ये सहाय्यक मॅनेजर म्हणून काम करतो. गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता रेस्टारंटचा एक कर्मचारी शिवम हा नेहमीप्रमाणे कामावर आला होता. यावेळी त्याला कॅश काऊंटर आणि टिप बॉक्सचे कुलूप तुटलेले दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने योगेशला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर योगेश हा रेस्ट्रॉरंटमध्ये आला होता. यावेळी त्याला कॅश काऊंटरमधील 25 हजार आणि टिप बॉक्समधील सव्वादोन लाखांची कॅश असा सुमारे अडीच लाखांची कॅश अज्ञात चोरट्याने चोरी करुन पलायन केल्याचे दिसून आले.
आरोपीने रेस्ट्रॉरंटच्या बाथरुममधून आत प्रवेश केला होता आणि पळून जाताना तो बाथरुममधून बाहेर गेला होता. ही माहिती नंतर योगेशकडून खार पोलिसांना देण्यात आली होती. ही मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी रेस्ट्रॉरंटमधील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. तपासात आरोपीने तोंडावर मास्क लावले होते, उडी प्रकारचे शर्ट आणि जीन्स परिधान केले होते. हाताचे ठसे सापडू नये म्हणून त्याने ग्लोव्हज घातले होते. स्वतची ओळख पटणार नाही याची त्याने पुरेपुरे काळजी घेतली होती. तपासात हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु केला होता.
या फुटेजवरुन आरोपी खार येथून दादर आणि दादरहून मुंब्राला पळून गेल्याचे दिसून आले. काही वेळानंतर त्याने हुडी आणि मास्क काढला होता. त्यावरुन तपासाचे चक्रे फिरली. आरोपीची ओळख पटताच त्याला शुक्रवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यातघेतले होते. तपासात त्याचे नाव शहानवाज शेख असल्याचे उघडकीस आले. तो बँग रेस्ट्रॉरंटमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून फ्रंट ऑफिस कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याला मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने त्याच्याच रेस्ट्रॉरंटमध्ये चोरीची योजना बनविली होती. त्याने एका स्पॅनिश चोरीची कथा पाहिली होती. त्यात काही दरोडेखोर मास्क आणि हुडी घालून चोरी करत असल्याचे दिसून आले होते.
याच कथेतून प्रेरणा घेऊन तो रेस्ट्रारंटमध्ये शिरला आणि चोरी करुन पळून गेला होता. आपल्याला कोणीही ओळखणार नाही याची त्याने काळजी घेतली होती. मात्र मुंब्रा येथे गेल्यानंतर त्याने त्याचे उडीआणि मास्क काढल्यानंतर त्याची ओळख पटली. त्यानंतर त्याला चोरीच्या काही कॅशसहीत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मित्रांना पार्टी देण्याासाठी त्याने चोरीची योजना बनविली, मात्र याच पैशांसाठी त्याला आता पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.