डिजीटल अरेस्टची भीती दाखवून वयोवृद्ध समाजसेविकेची फसवणुक

1.60 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस नाशिक येथून अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 नोव्हेंबर 2025
मुंबई, – डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका वयोवृद्ध समाजसेविका महिलेची एक कोटी साठ लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील मुख्य आरोपीस नाशिक येथून पश्चिम प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अंकुश रामराव मोरे असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा नाशिकचा रहिवाशी आहे. फसवणुकीसाठी सायबर ठगांना खाती पुरविणे, फसवणुकीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करणे आदी जबाबदारी त्याच्यावर होती. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मधू मोहन बजाज ही 76 वर्षांची वयोवृद्ध महिला खार येथे राहत असून त्या समाजसेविका म्हणून परिचित आहेत. तिच्या वडिलांचा व्यवसाय होता. ही सर्व प्रॉपटी सध्या तिच्या नावावर आहे. 12 डिसेंबर 2024 रोजी तिला प्रसाद सिंग नावाच्या एका ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरने कॉल केला होता. तिचा मोबाईल क्रमांक मनी लॉड्रिंगच्या गुन्हयांत वापरण्यात आला असून तिचा सिमकार्ड एक तासांनी बंद होणार आहे. तिच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांकडून मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याच गुन्ह्यांत तिची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार असलचे सांगितले. त्यानंतर तिला सुनिलकुमार गौतम नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो दिल्लीतील आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करुन जोरजोरात बोलून तिला घाबरविण्याचा प्रयत्न केला.

तिच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगची तक्रार आली असून तिच्या मोबाईलसह आधारकार्डचा गुन्ह्यांत वापर झाला आहे. काही वेळानंतर तिला संदीप राव नावाच्या एका व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. त्याने पोलीस गणवेश घातला होता. त्याने तिला बेडरुममध्ये जाण्यास सांगून दरवाजा आणि खिडक्या बंद करण्यास सांगितले. त्याने तिच्या कागदपत्रांवरुन एका खाजगी बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात 68 लाखांचा मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला आहे. त्यात तिला किती पैसे मिळाले याबाबत विचारणा केली. यावेळी तिने संबंधित बँक खात्यासह मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मला कोणीही पैसे दिले नाही. त्यानंतर त्याने तिला तुम्ही सिनिअर सिटीझन असल्याने तूर्त त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही. मात्र ते त्यांच्या राहत्या घरी डिजीटल अरेस्ट असतील.

या दरम्यान त्यांना कोणालाही संपर्क साधता येणार नाही, कुठे बाहेर जाता येणार नाही. त्यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्या घरी पोलीस पाठवून त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे सांगितले. त्याच दिवशी तिला प्रदीप सिंग नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो सीबीआय अधिकारी असलचे सांगितले. त्याने तिच्याकडील बँक खात्याची डिटेल्स काढून तिला बँकेतील सर्व रक्कम सीबीआयच्या सिक्रेट अकाऊंटमध्ये जमा करण्यास सांगितले. चौकशी पूर्ण होताच तिची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. अटकेसह कारवाईच्या भीतीने तिने संबंधित बँक खात्यात आधी सत्तर लाख आणि नंतर नव्वद लाख रुपये असे एक कोटी साठ लाख रुपये पाठविले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर तिला कोणीही कॉल केला नाही, तिची चौकशी झाली नव्हती.

16 डिसेंबरला तिचा भाचा मनिष बजाज तिच्या घरी आला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार मनिषला सांगितला. यावेळी मनिषने तिची फसवणुक केल्याचे सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना गेल्या अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या अंकुश मोरे याला पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले.

चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानेच उघडलेल्या बँक खात्यात फसवणुकीची सुमारे नव्वद लाखांची कॅश जमा झाली होती. ही कॅश नंतर त्याने सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना विविध बॅकेत खाती उघडून दिले होते. तपासात ही माहिती उघड होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page