डॉ. गौरी गर्ज आत्महत्येप्रकरणी पीए पतीला अटक व कोठडी
आत्महत्या की हत्या याचा पोलिसांकडून संमातर तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 नोव्हेंबर 2025
मुंबई, – वरळीतील राहत्या घरी शनिवारी आत्महत्या केलेल्या डॉक्टर पत्नी गौरी अनंत गर्जे हिचा पती आणि पंकजा मुंडे यांचा खाजगी स्वीय सहाय्यक अनंत भगवान गर्जे याला वरळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने गुरुवार 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आत्महत्येच्या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून गौरीने आत्शमहत्या केली की तिची हत्या झाली याचा पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरळी पोलिसांसह फॉरेन्सिक टिम तिच्या वरळीतील राहत्या घरी गेले होते. या पथकाने संपूर्ण घराची तपासणी करुन काही सॅम्पल ताब्यात घेतले आहे.
मूळची बीडची रहिवाशी असलेली गौरी हिचे फेब्रुवारी 2025 रोजी अनंत गर्जेशी विवाह झाला होता. विवाहानंतर गौरी ही अनंतसोबत वरळीतील जी. एम. भोसले रोडवर, नवीन बीडीडी वसाहत, डी विंगच्या तिसाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 3006 मध्ये राहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासोबत तिचा दिर अजय हादेखील राहत होता. सध्या ती सायन रुग्णालयात कामाला होती. काही महिन्यांपूर्वी तिला तिच्या घरातील शिफ्टींगदरम्यान काही दस्तावेज सापडले होते. त्यात एका महिलेच्या गरोदरविषयी तसेच तिचा पती अनंत गर्जे असल्याचे समजले होते. या प्रकारानंतर गौरी ही प्रचंड मानसिक तणावात होती. याच कारणावरुन तिचे अनंतसोबत कौटुंबिक वाद सुरु होते. या वादातून अनंतने तिला हा प्रकार कोणालाही न सांगण्याचा, तिने तसे केल्यास तिच्या नावाने सुसायट नोट लिहून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
हा संपूर्ण प्रकार तिने तिच्या आईला सांगितला होता. पतीकडून झालेला विश्वासघात सहन न झाल्याने गौरी ही मानसिक नैराश्यात होती. याच नैराश्यातून तिने शनिवारी तिच्या वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर तिचे वडिल अशोक मारुती पालवे यांनी गौरीच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला होता. गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप करुन त्यांनी तिच्या पतीसह नणंद आणि दिराविरुद्ध वरळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनतर तिचा पती अनंत भगवान गर्जे, नणंद शितल भगवान गर्जे आणि दिर अजय भगवान गर्जे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अनंतची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीनंतर त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्यांना दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी गौरीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांची चौकशी बाकी आहे. दुसरीकडे अनंत गर्जेचे वकिल मंगेश देशमुख यांनी आरोपी अनंत हे पळून न जाता स्वतहून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले आहे. त्यांनी पोलिसांना सहकार्य केले होते. पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. त्यामुळे त्यांना कमीत कमी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती.
दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अनंत यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी वरळीतील राहत्या घराची वरळी पोलिसांसह फॉरेन्सिक टिमकडून कसून तपासणी करण्यात आली आहे. काही पुरावे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. योग्य वेळेस या संशयास्पद मृत्यूबाबत अधिकृतपणे खुलासा केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल लवकरच पोलिसांना सादर केला जाणार आहे.