मैत्रिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मित्राला अटक
ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करणे चांगलेच महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गोरेगाव येथे राहणार्या मैत्रिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संजयराज विश्वकर्मा या आरोपी मित्राला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मैत्रिणीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीसह ब्लॅकमेल करुन त्याने तिच्याकडून पैशांची मागणी केली, त्यापैकी काही रक्कम त्याने तिच्याकडून घेतली होती. याच ब्लॅकमेलसह धमकीला कंटाळून या मैत्रिणीने आत्महत्या केली होती. त्यामुळे संबंधित प्रकरण संजयराजला चांगलेच महागात पडले आहे.
42 वर्षांचे तक्रारदार गोरेगाव येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची मृत मुलगी सध्या शिक्षण घेत होती. याच परिसरात राहणारा संजयराज हा तिचा मित्र होता. ते दोघेही एकमेकांच्या सतत संपर्कात होते. व्हॉटअप आणि मोबाईलवरुन ते दोघेही अनेकदा तासनतास गप्पा मारत असायचे. हा प्रकार तिच्या पालकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्यापासून अंतर ठेवण्याचा सल्ला दिला होता. तरीही ती त्याच्या संपर्कात होती. गेल्या काही दिवसांपासून ही मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. त्यामुळे तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली होती. यावेळी तिने संजयराजने तिला एका मित्राच्या कार्यक्रमांत नेले होते. तिथे तिचे काही फोटो काढले होते. ते फोटो एडीट करुन त्याने तिचे अश्लील फोटो बनविले होते. ते फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला पैशांसाठी ब्लॅकमेल करत आहे.
तिने त्याला अनेकदा पैसे दिले, तरीही तो तिला धमकावत होता. हा प्रकार लक्षात येताच तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला योग्य ती समज देऊन तिला पुन्हा संपर्क न साधण्याचा तसेच तिच्यापासून दूर राहण्याची समज दिली होती. मात्र या घटनेनंतर ही मुलगी प्रचंड प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून तिला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून शनिवारी 15 नोव्हेंबरला तिने तिच्या राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हा प्रकार नंतर तिच्या पालकांनी संजयराजविरुद्ध गोरेगाव पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी मृत मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, तिला ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करुन मानसिक शोषण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी मित्राला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.