भायखळा येथील व्यावसायिकाच्या घरी 33 लाखांची घरफोडी
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 नोव्हेंबर 2025
मुंबई, – भायखळा परिरसरात एका व्यावसायिकाच्या घरी घरफोडी झाल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सुमारे 33 लाख रुपयांचे विविध सोन्याचे, चांदीचे दागिने, बिस्कीट तसेच एक लाख ऐंशी हजाराची कॅश असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. रविवारी रात्री उशिरा उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना 22 नोव्हेंबर रात्री साडेआठ ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री तीनच्या सुमारास माझगाव येथील गणपावडर रोड, जरीमरी माता मंदिर मार्ग, डांबरवाला अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंटच्या रुम क्रमांक एकमध्ये तक्रारदार अबरार अहमद अझीज सोलकर हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहतात. त्यांचा वडिलोपार्जित शिपिंग टेस्टिंग हाऊसिंगचा व्यवसाय आहे. 2021 रोजी त्यांचे लग्न झाले होते. लग्नात त्यांच्या पत्नीला तिच्या कुटुंबियांकडून काही सोन्याचे दागिने देण्यात आले होते. त्यांनतर ते दरवर्षी त्यांना उत्पनातून वेगवेगळे सोन्या-चांदीचे दागिने बनवत होते.
2021 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत त्यांनी 28 तोळे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. त्यात काही सोन्या-चांदीच्या बिस्कीटसह इतर दागिन्यांचा समावेश होता. त्यांच्या सासरे आजारी असल्याने त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन होणार होते. त्यामुळे त्यांची पत्नी तिच्या आईला मदत म्हणून रत्नागिरीच्या चिपळून येथील गावी जाणार होती. शनिवारी 22 नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता अबरार हे पत्नीला सोडण्याासठी त्यांच्या कारमधून घरातून निघाले होते. पत्नीला सोडून ते त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते.
दुसर्या दिवशी रात्री उशिरा ते त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ते त्यांचे परिचित अय्याझ मुकादम आणि अफ्ताफ सोलकर यांच्यासोबत आतमध्ये गेले असता त्यांना कपाटातील विविध सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, बिस्कीट, एक लाख ऐंशी हजार रुपयांची कॅश असा सुमारे 33 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.
घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. कपाटातील दागिने आणि कॅश चोरी करुन त्याने पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ही माहिती भायखळा पोलिसांना दिली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी पंचनामा करुन अबरार सोलकर यांची जबानी नोंदवून घेतली होती.
त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.