मध्यप्रदेशातून आणलेल्या ड्रग्जसहीत चारजणांच्या टोळीस अटक

सव्वादोन कोटीच्या एमडी ड्रग्जसहीत गुन्ह्यांतील कार हस्तगत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 नोव्हेंबर 2025
ठाणे, – मध्यप्रदेशातून आणलेल्या एमडी ड्रग्जसहीत चारजणांच्या एका टोळीला ठाण्याच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. इम्रान ऊर्फ बब्बू खिजहार खान, वकास अब्दुलरब खान, ताकुद्दीन रफिक खान आणि कमलेश अजय चौहाण अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण मध्यप्रदेशचे रहिवाशी आहे. या आरोपींकडून पोलिसांनी सव्वादोन कोटीचे एमडीसह गुन्ह्यांतील कार जप्त केली आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मध्यप्रदेशातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात एमडी ड्रग्जच्या तस्करी प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध ठाणे पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच काहीजण मध्यप्रदेशातून कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज घेऊन आले होते. या ड्रग्जची ठाणे शहरात विक्री होणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अमीत सकपाळ यांना मिळाली होती.

या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅण्टी नारकोटीक्सचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, दिपक डुम्मलवाड, पोलीस हवालदार अमोल देसाई, हरिष तावडे, अभिजीत मोरे, अजय सपकाळ, शिवाजी रावते, अमोल पवार, संदीप चव्हाण, नंदकिशोर सोनगिरे, अमीत सकपाळ, हुसैन तडवी, गिरीश पाटील, पोलीस नाईक अनुप राक्षे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस शिपाई कोमल लादे, पोलीस शिपाई आबाजी चव्हाण यांनी ठाण्यातील नौपाडा, चरईच्या एमटीएनएल कार्यालयासमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती.

यावेळी तिथे एका कारमधून चारजण आले होते. या चारही संशयितांची हालचाल संशयास्पद वाटत होती. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या कारची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलिग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जसहीत गुन्ह्यांतील कार असा 2 कोटी 24 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

याच गुन्ह्यांत चारही आरोपींना अटक करण्यात आली. तपासात त्यांची नावे इम्रान खान, ताकुद्दीन खान, कमलेश चौहाण आणि वकास खान असल्याचे उघडकीस आले. ते चौघेही मध्यप्रदेशचे रहिवाशी असून त्यांनी ते एमडी ड्रग्ज मध्यप्रदेशातून मुंबईसह ठाण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. यातील इम्रान खान आणि कमलेश चौहाण हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुद्ध धाननोद, रावजी बाजार इंदौर, नागलवाडी, धरमपुरी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page