अभिनेता-दिग्दर्शक सिद्धांत कपूरची पाच तास चौकशी

बॉलीवूडसह मॉडेल, राजकरणी रेव्ह ड्रग्ज पार्टीप्रकरण

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जप्रकरणी दुबईहून प्रत्यार्पण करण्यात आलेला मुख्य आरोपी सलमान सलीम शेख ऊर्फ शेरा याच्या जबानीतून देश-विदेशातील रेव्ह ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाल्यानंतर घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलचे अधिकारी आता अ‍ॅक्शन मोडवर आहे. याच ड्रग्जसहीत रेव्ह पार्टीप्रकरणी मंगळवारी सिनेअभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आणि सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता सिद्धांत कपूर याची संबंधित अधिकार्‍यांनी सुमारे पाच तास कसून चौकशी केली. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही, मात्र सिद्धांतने एका पार्टीत सामिल झाल्याचे तसेच पार्टीत ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिल्याचे बोलले जाते. दरम्यान ही चौकशी अपूर्ण राहिल्याने सिद्धांत पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत ओहान अवत्रामणी ऊर्फ औराला चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले असून तो मुंबईबाहेर असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. असे सांगण्यात आले.

कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जप्रकरणी घाटकोपर युनिटने सलमान शेख ऊर्फ शेरा याला दुबईतून प्रत्यार्पण केल्यानंतर अटक केली होती. पोलीस तपासात सलमाने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यात त्याने देश-विदेशात अनेक बॉलीवूड, फॅशन आणि राजकारण्यासाठी रेव्ह ड्रग्ज पार्ट्यांचे आयोजन केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने काही बॉलीवूड कलाकारासह फॅशन क्षेत्रातील काही मॉडेल, राजकारण्यांची नावे सांगितली होती. रेव्ह पार्ट्यांमध्ये सामिल झालेल्या सेलिब्रिटींना त्याने ड्रग्ज पुरविल्याची कबुली दिली आहे. या पार्टीत कोण-कोण सहभागी झाले होते, त्याची एक यादीच पोलिसांकडून बनविण्यात आली होती.

वरिष्ठांच्या आदेशावरुन घाटकोपर युनिटने संंबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात सिद्धांत कपूरचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले होते. या समन्सनंतर मंगळवारी दुपारी सिद्धांत कपूर हा घाटकोपर युनिट कार्यालयात हजर झाला होता. यावेळी त्याची सुमारे पाच तास पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. ही चौकशी अपूर्ण राहिल्याने त्याला गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता त्याची चौकशी करुन सुटका करण्यात आली. त्याच्या चौकशीत तो एका पार्टीत सामिल झाला होता, त्यात त्याने ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली आहे.

याच प्रकरणात सिद्धांतसह सीएनएनसीचे सोशल मिडीयाचे औरी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले होते. त्यामुळे त्याचीही लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्याने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांकडे वेळ मागितल्याचे बोलले जाते. तो शहराबाहेर असल्याने 25 नोव्हेंबरनंतर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे बोलले जाते. या दोघांसह इतर काहींचे नावे समोर आल्यानंतर त्यांना टप्याटप्याने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page