पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह विक्रीचा पर्दाफाश
मुलीची सुखरुप सुटका करुन मामा-मामीसह पाचजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – सांताक्रुज येथे राहणार्या एका पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्या विक्रीचा वाकोला पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. लतिफ अब्दुल माजिद शेख, लॉरेन्स निकलेस फर्नाडिस, मंगल दगडू जाधव, करण मारुती सनस आणि वृंदा विनेश चव्हाण अशी या पाचजणांची नावे आहेत. या आरोपींच्या तावडीतून अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पैशांची गरज असल्याने बळीत मुलीच्या मामा-मामीनेच हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर पाचही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टाने शुक्रवार 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अंजली अजीत कोरगावकर या महिलेला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
यातील तक्रारदार महिला ही सांताक्रुज येथील वाकोला परिसरात राहत असून तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे. शनिवारी 22 नोव्हेंबरला रात्री उशिरा तिची मुलगी अचानक मिसिंग झाली होती. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिच्यासह तिच्या कुटुंबियांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिने तिच्या मुलीची वाकोला पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वाकोला पोलिसांना गुन्हा नोंदवून मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून पाच वर्षांच्या मुलीचा शोध सुरु केला होता. त्यासाठी झोनमधील सर्वच पोलीस ठाण्याच्या निवडक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्याचे तीन ते चार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने मुलीचा शोध केला असता एका संशयित रिक्षाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या रिक्षातून एक जोडपे संबंधित मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. या रिक्षासोबत एका बाईकवरुन दोन संशयित व्यक्ती दिसत होते. या रिक्षाची माहिती काढत असताना रिक्षाचालकाला वाकोला येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने या मुलीच्या अपहरणामागे तिचेच मामा लॉरेन्स फर्नाडिस आणि मामी मंगल जाधव यांचा सहभाग असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर या पथकाने या दोघांनाही पनवेल, विठ्ठलवाडी परिसरातून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच या मुलीला करण सनस याला नव्वद हजारांना विक्री केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर न्यू पनवेल, उसली बु्रदुक येथून पोलिसांनीी करणला ताब्यात घेतले. त्याने या मुलीला वृंदा चव्हाण आणि अंजली कोरगावकर या दोन महिलांना एक लाख ऐंशी हजारांमध्ये विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर या दोन्ही महिलांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वृंदा चव्हाण हिला पनवेल येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. तिच्या घरातून अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची सुखरुप सुटका केली. या मुलीला नंतर तिच्या पालकांना सोपविण्यात आले होते.
तपासात मुलीचे मामा लॉरेन्स फर्नाडिस आणि मामी मंगल जाधव यांना पैशांची गरज होती. याच पैशांसाठी त्यांनी बळीत मुलीच्या अपहरणाचा कट रचला होता. शनिवारी मुलीचे अपहरण करुन त्यांनी इतर चौघांच्या मदतीने मुलीची विक्री केली होती. मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी अपरहणासह मुलीच्या विक्रीचा पर्दाफाश केला आणि गुन्ह्यांतील सहापैकी पाच आरोपींना शिताफीने अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर पाचही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यांचा तपास पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाकोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक खराडे, वैभव स्वामी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश्वर तळेकर, सुदर्शन सुर्वे, कदम, पोलीस उपनिरीक्षक डोळे, माळी, गुट्टे, बंडगर, बडगुजर, महिला पोलीस उपनिरीक्षक सुनिता घाडगे, महिला पोलीस हवालदार चोपडे, पोलीस शिपाई, गायकवाड, विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी, निर्मलनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बनकर, लोंढे, खैरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बागल, बीकेसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दौंडकर, ठोसर यांनी केला.