ड्रग्ज रेव्ह पार्टीप्रकरणी समाजसेवक ओरााची चौकशी
जबानी नोंदवून पुन्हा चौकशीसाठी समन्स राहण्याचे आदेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 नोव्हेंबर 2025
मुंबई, – अंडरवर्ल्डकडून आयोजित करण्यात आलेल्या देश-विदेशातील ड्रग्ज पार्टीत सहभागी झाल्याचा आरोप असलेल्या बॉलीवूडचा समाजसेवक ओहान अवत्रामणी ऊर्फ औरा याची घाटकोपर युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी चौकशी केली आहे. याच गुन्ह्यांत मंगळवारी अभिनेता सिद्धांत कपूरची चौकशी झाली होती, त्यानंतर दुसर्या दिवशी ओराची चौकशी झाल्याने बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. ओराची जबानी नोंदवून त्याला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत बॉलीवूड, मॉडलिंग आणि राजकीय क्षेत्रांशी संबंधितांची चौकशी होणार आहे. या सर्वांना टप्याटप्याने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.
252 कोटीच्या एमडी ड्रग्जप्रकरणाचा सध्या घाटकोपर युनिटकडे तपास सुरु आहे. या गुन्ह्यांतील एक मुख्य आरोपी आणि दुबईत वास्तव्यास असलेल्या सलमान सलीम शेख ऊर्फ शेरा याला दुबईहून प्रत्यार्पण करुन भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याचा ताबा घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाला देण्यात आला होता. त्याच्या चौकशीत त्याने भारतासह विदेशात मोठ्या प्रमाणात रेव्ह पार्ट्याचे आयोजन केल्याची कबुली देताना या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठा केल्याचे सांगितले होते. इतकेच नव्हे तर देश-विदेशात आयोजित करण्यात आलेल्या या रेव्ह ड्रग्ज पाटीत बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटीसह फॅशन इंडस्ट्रिज तसेच काही राजकारणी सहभागी झाले होते.
त्यात सिद्धांत कपूरसह औरा यांचा समावेश होता. त्यामुळे या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. त्यापैकी सिद्धांत कपूरची मंगळवारी या पथकाने सुमारे पाच तास चौकशी करुन सुटका केली होती. बुधवारी ओरा हा घाटकोपर युनिट कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. दुपारी दिड वाजता तो आल्यानंतर त्याची पोलिसांकडून कसून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती.
त्याला गेल्या गुरुवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते, मात्र तो मुंबईबाहेर होता, त्यामुळे त्याने पोलिसांकडे वेळ मागून घेतली होती. मुंबईत परत येताच तो बुधवारी चौकशीसाठी हजर झाल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्यांत अनेक बॉलीवूड, मॉडलिंग आणि राजकीय क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींची नावे समोर आल्याने त्यांची टप्याटप्याने पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे.