मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 नोव्हेंबर 2025
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांत सुमारे साडेचौदा लाखांचे सोन्याचे, चांदीचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन पलायन केल्याची घटना अंधेरीसह मुलुंड आणि वरळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी, दादर आणि मुलुंड पोलिसांनी तीन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ललित भवरलाल संकलेचा हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहतात. मालपा-डोंगरी परिसरात त्यांच्या मालकीचे मरुधर ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. शनिवारी दिवसभर शॉपमध्ये काम करुन रात्री साडेनऊ वाजता ते शॉप बंद करुन घरी निघून गेले होते. रविवारी 23 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता ते शॉपमध्ये आले होते. यावेळी त्यांना शॉपला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता शॉपमध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. आतमध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. शॉपमधील दागिन्यांची पाहणी केल्यानंतर सुमारे साडेसहा लाखांचे सोन्याचे, चांदीचे विविध दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने रात्री साडेदहा ते सकाळी साडेनऊच्या सुमारास शॉपमधील कुलूप तोडून आत प्रवेश करुन सुमारे साडेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
दुसर्या घटनेत मुलुंड येथे अज्ञात चोरट्याने सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. मनिषा चंद्रकांत कोळी ही 47 वर्षांची महिला मुलुंडच्या नेहरुनगर चाळीत राहत असून तिचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता तिचा मुलगा कॉलेज तर ती तिच्या पतीसोबत मार्केटमध्ये गेली होती. दुपारी पावणेदोन वाजता ती घरी आली होती. यावेळी तिला तिच्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि सात हजाराची कॅश असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर तिने मुलुंड पोलिसांना तिच्या घरी चोरी झाल्याची तक्रार केली होती.
तिसरी घरफोडीची घटना वरळी येथे घडली. इंद्रपाल भीमराजजी जैन हे हार्डवेअर व्यावसायिक असून त्यांचा वरळी परिसरात नूतन टेडर्स नावाचे एक हार्डवेअर दुकान आहे. त्यांच्या लहान मुलाचे लग्न असल्याने त्यांनी लग्नासाठी साडेतीन लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम त्यांनी दुकानातील ड्राव्हरमध्ये ठेवली होती. शनिवारी रात्री ते दुकान बंद करुन घरी गेले. दुसर्या दिवशी ते दुकानात आले असता त्यांना त्यांच्या नोकराने दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. अज्ञात चोरट्याने रात्री उशिरा त्यांच्या दुकानात प्रवेश करुन दुकानातील ड्राव्हरमधील साडेतीन लाखांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दादर पोलिसांना ही माहिती दिली होती.
याप्रकरणी एमआयडीसी, दादर आणि मुलुंड पोलिसांनी तीन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या काही फुटेजमधून आरोपींची ओळख पटल्याचे सांगण्यात आले.