सेशन कोर्टातून पळालेल्या आरोपीस 24 तासांत अटक

घरफोडीच्या गुन्ह्यांत आर्थर रोड कारागृहात होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 नोव्हेंबर 2025
मुंबई, – सेशन कोर्टातून पळालेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस ट्रॉम्बे पोलिसांच्या एका विशेष पथकाने अवघ्या 24 तासांत शिताफीने अटक केली. रामकुमार गयाप्रसाद निशाद ऊर्फ कुमार असे या 45 वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. कुमार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडीसह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यांत त्याला सेशन कोर्टात हजर केल्यानंतर तो पळून गेल्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे यांनी सांगितले.

कुमार हा उत्तरप्रदेशच्या बस्तीचा रहिवाशी असून सध्या मानखुर्द परिसरात राहत होता. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. त्यामुळे त्याला आर्थर रोड कारागृहात पाठविण्यात आले होते. मंगळवारी दुपारी त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी तो सेशन कोर्टातून पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच पोलीस शिपाई सचिन लाटवडे यांनी कुलाबा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनतर कुमारविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याची माहिती सर्वच पोलीस ठाण्यात कळविण्यात आली होती. ही माहिती प्राप्त होताच त्याच्या अटकेसाठी ट्रॉम्बे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तो उत्तरप्रदेशातील गावी किंवा मानखुर्द येथील नातेवाईकांच्या घरी जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मानखुर्द आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवली होती. ही शोधमोहीम सुरु असताना कुमार हा त्याच्या मानखुर्द येथील महाराष्ट्रनगरातील नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋता नेमळेकर, पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास जाधव, पोलीस हवालदार सावंत, शिंदे, सुरवसे, पाटील, बाविस्कर, पाटील, घूटूगडे, आटपाडकर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या कुमारला पोलिसांनी शिताफीने अटक केली.

तपासात कुमार हा सेशन कोर्टातून पळून गेल्यानंतर त्याच्या गावी जाणार होता. त्यापूर्वी तो महाराष्ट्रनगरातील त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता, मात्र तिथे आल्यानंतर त्याला 24 तासात पोलिसांनी शिताफीने अटक केली. कुमार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला अटक केली होती. अलीकडेच त्याला एका घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी कुलाबा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page