वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या चार आरोपींना अटक
ठाणे, सातारा, कोल्हापूर व पुणे येथे पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – वेगवेगळ्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या चार आरोपींना काळाचौकी, रफि अहमद किडवाई, भोईवाडा पोलिसांनी अटक केली. जावेद युसूफ शेख, विलास गणपत घोरपडे, राकेश अमृतलाल पासी आणि नफीज अब्दुल अजीज शेख अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या सर्वांना विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यातील तीन आरोपी जामिनावर बाहेर येताच पळून गेले होते तर एका आरोपीला गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती.ठाणे, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातून स्थानिक पोलिसांनी ही कामगिरी केल्याचे सांगण्यात आले.
2005 साली तीन आरोपींविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली होती. त्यात जावेद युसूफ शेख या 48 वर्षांच्या आरोपीचा समावेश होता. अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्याला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर येताच जावेद हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याला सेशन कोर्टाने फरार आरोपी घोषित करुन त्याच्या अटकेचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. मात्र जावेद हा गेल्या वीस वर्षांपासून सतत पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना जावेद हा ठाण्यात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर 20 नोव्हेंबरला या पथकाने ठाण्यातून जावेदला अटक केली. अटकेनंतर त्याला सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
दुसर्या कारवाईत काळाचौकी पोलिसांनी विलास गणपत घोरपडे या आरोपीस अटक केली. विलास हा गेल्या 25 वर्षांपासून फरार होता. 1992 त्याच्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी 325, 504, 114 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयांत अटक केल्यानंतर लोकल कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने स्थायी अटक वॉरंट जारी केले होते. त्याचा शोध सुरु असताना त्याला 20 वर्षांनी सातारा येथून पोलिसांनी अटक केली. स्वतची अटक टाळण्यासाठी तो नाव बदलून सातारा येथे तो एका भाड्याच्या रुममध्ये राहत होता. मात्र वीस वर्षानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले.
तिसर्या घटनेत अकरा वर्षांपूर्वी काळाचौकी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्नासह मारामारीच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत राकेश पासी याचे नाव समोर आले होते. मात्र गुन्हा दाखल होताच राकेश हा पळून गेला होता. गेल्या अकरा वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी होता, त्यामुळे त्याच्या अटकेसाठी काळाचौकी पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशला पाठविण्यात आले होते. तिथे शोध घेत असताना तो कोल्हापूर येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर संबंधित पोलीस टिम कोल्हापूरला रवाना झाले होते. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने बुधवारी गेल्या अकरा वर्षांपासून फरार असलेल्या राकेश पासी याला शिताफीने अटक केली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.
अन्य एका कारवाईत भोईवाडा पोलिसांनी नफीज शेख या 61 वर्षांच्या आरोपीस अटक केली. नफीज हा गेल्या 37 वर्षांपासून फरार होता. 16 जानेवारी 1988 साली दादर येथील दादासाहेब फाळके रोडवर तक्रारदाराची सोन्याची चैन आणि कॅश घेऊन नफिज हा पळून गेला होता. या घटनेनंतर तक्रारदाराने भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. तपासात या गुन्ह्यांत नफिजचा सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने फरार आरोपी म्हणून घोषित केले होते. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी पुण्यातून नफिजला शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पलंगे, सचिन कदम, काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे, भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मराठे, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, माधुरी पाटील, महागावकर, संदेश कदम, सहाय्यक फौजदार सुरेश कडलग, पोलीस हवालदार बारसिंग, प्रिंदावणकर, बागी, पोलीस शिपाई राठोड, गावीत, ओंकार कंक, महिला पोलीस शिपाई लोहार, बेलोस्कर यांनी केली.