अंधेरी येथे अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीची हत्या
हत्येनंतर उत्तरप्रदेशात गेलेल्या प्रियकरासह दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी अंधेरीतील पाईपलाईन परिसरात झालेल्या मोहीत जगतराम स्वामी या 28 वर्षांच्या डिलीव्हरी बॉयच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात अंधेरी पोलिसांनी यश आले आहे. अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीची हत्या करुन उत्तरप्रदेशात पळून गेलेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. रोहित गंगाराम पालल आणि मनोजकुमार विश्वनाथ सोनी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. मोहीतच्या पत्नीच्या एका आरोपीसोबत प्रेमसंंबंध होते, याच संबंधातून त्याने तिच्या पतीची मद्यप्राशन करुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मोहीम स्वामी हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो सध्या अंधेरी येथे त्याच्या पत्नीसोबत राहतो. गेल्या काही महिन्यांपासून तो डिलीव्हरी बॉयचे काम करत होता. यातील अटक दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशच्या गौंडाचे रहिवाशी आहे. त्यातील एकाचे मोहीतच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. या दोघांनाही मोहीतने यापूर्वी रंगेहाथ पकडले होते. यावेळी रागाच्या भरात त्याने आरोपीला बेदम मारहाण केली होती. तसेच त्याच्या पत्नीला पुन्हा न भेटण्याची ताकिद दिली होती. इतकेच नव्हे तर त्याच्या कुटुबियांनी आरोपींच्या पालकांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर आरोपीचे ठरलेले लग्न मोडले होते. त्याचा आरोपीच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून त्याने प्रेयसीच्या पतीच्या हत्येची योजना बनविली होती. याकामी त्याने त्याच्या एका मित्राची मदत घेतली होती.
ठरल्याप्रमाणे 25 नोव्हेंबरला ते दोघेही उत्तरप्रदेशातून मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर त्याने मोहीतला कॉल करुन अंधेरीतील पाईपलाईनजवळील निर्जनस्थळी बोलाविले होते. त्यामुळे तो त्याला भेटण्यासाठी गेला होता. तिथेच त्यांनी रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन केले होते. दारुच्या नशेत असताना या दोघांनी मोहीतची जड वस्तूने बेदम मारहाण केली होती. या हत्येनंतर ते दोघेही दुसर्या दिवशी उत्तरप्रदेशला निघून गेले होते. मोहीतचा मृतदेह एका दक्ष नागरिकाच्या निदर्शनास आला होती. ही माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. मोहीतची ओळख पटल्यानंतर त्याच्या पत्नीसह इतर कुटुंबियांची पोलिसांनी चौकशी केली होती.
या चौकशीतून अनेक गोष्टींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. या माहितीनंतर अंधेरी पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रोहित पाल आणि मनोजकुमार सोनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनी मोहीतची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे आताापर्यंतच्या चौकशीतून उघडकीस आले आहे.
ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सतीश कावणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कांदळकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, समाधान सुपे, सुहास पाटील, रोहन सुर्वे, मेघवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले, जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मिसाळ, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, साकिनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण, सहार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत बावचकर, पोलीस हवालदार पिसाळ यांनी केली.