दोन वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दोन वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार मालाड आणि दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. यातील एका घटनेत रस्त्यावरुन जाणार्या मुलीच्या छातीवर नकोसा स्पर्श करण्यात आला तर दुसर्या घटनेत पित्यानेच स्वतच्या मुलीचा विनयभंग केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मालवणी आणि दहिसर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांतील आरोपीला दहिसर पोलिसांनी अटक केली तर आरोपी पित्याचा मालवणी पोलीस शोध घेत आहेत.
सोळा वर्षांची बळीत मुलगी ही दहिसर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता ती रस्त्यावरुन पायी तिच्या राहत्या घराच्या दिशेने जात होती. यावेळी तिथे भाविन नावाचा एक तरुण आला. काही कळण्यापूर्वीच त्याने तिच्या छातीपासून पोटावरुन नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. घरी आल्यानंतर तिने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी बळीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भाविन या आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
दुसरी घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. याच परिसरात सोळा वर्षांची बळीत मुलगी राहते. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरला ती तिच्या घरी असताना तिच्या वडिलांनी तिच्याशी अनेकदा अश्लील शिवीगाळ केली होती. तिने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता तो तिच्याशी अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत होता. इतकेच नव्हे तर त्याने तिला बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. सतत अश्लील शिवीगाळ करुन त्याने तिच्याशी गैरवर्तन केले होते. त्यामुळे तिने तिच्या पित्याविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.