घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील दुकलीस अटक
चोरीच्या सर्व मुद्देमालासह गुन्ह्यांतील रिक्षा हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – बोरिवलीतील एका शॉपमधील घरफोडीचा कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी अटक केली. सनोजकुमार चंदूप्रसाद हरिजन ऊर्फ रामू आणि सोनू गिरीजाशंकर दुबे अशी या दोघांची नावे आहेत. यातील सनोजकुमार हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तीनहून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमालासह गुन्ह्यांतील रिक्षा पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटकेनंतर दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे बोविलीतील कस्तुरबा रोड, साईप्रसाद इमारतीमध्ये बोअरवेल साहित्यांचा एक शॉप आहे. 15 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांच्या शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. दुकानातील 75 हजाराची पॉलिकॅब कंपनीची तांब्याची केबल चोरी करुन आरोपींनी पलायन केले होते. 16 नोव्हेंबरला सकाळी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिकेत शिंदे, पोलीस हवालदार राजेश पेडणेकर, तनवीर मुजावर, करुणेश म्हात्रे, पोलीस शिपाई महांतेश सवळी, प्रविण फरडे, महादेव पुरी, राहुल सांगळे, विकेश शिंगटे, राहुल वडर, अमोल फोपसे, तुषारी पुजारी, अनिकेत सकपाळ यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सनोजकुमार आणि सोनू या दोघांना ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांकडून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यांत त्यांनी एका रिक्षाचा वापर केला होता. ही रिक्षादेखील पोलिसांनी जप्त केली आहे. तपासात सनोजकुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तीनहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.