मॉडेल-अॅक्टरच्या फसवणुकीप्रकरणी निर्माता दिग्दर्शकावर गुन्हा दाखल
वेबसिरीज-चित्रपटाच्या गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मॉडेल-अॅक्टर असलेल्या एका महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी बॉलीवूडचे निर्माता-दिग्दर्शक कवल शर्मा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वेबसिरीज आणि चित्रपटात गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून कवल शर्मा यांनी 71 लाख 50 हजार रुपयांचा अपहार करुन तक्रारदार अॅक्टर-मॉडेलची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
57 वर्षांची तक्रारदार अॅक्टर-मॉडेल असून सध्या ती खार परिसरात राहते. तिला बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने 2007 साली अॅक्टिंग कोर्स केला होता. त्यानंतर तिने काही बॉलीवूड चित्रपटासह जाहिरातीमध्ये काम केले होते. 2016 साली तिच्या एका मैत्रिणीने तिची लेखक-निर्माता-दिग्दर्शक कवल शर्माशी ओळख करुन दिली होती. ते बॉलीवूडमधील नामांकित निर्माता-दिग्दर्शक असून त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटाची निर्मितीसह दिग्दर्शन केले होते. त्यात पाप की दुनिया, जीते है शान से, मर मिटेंगे, मालामाल, उस्ताद, गुन्हाओ का देवता, नकम, हिरालाल आणि पन्हालाल आदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांची फिल्म फार्मिंग इंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया नााची एक कंपनी असून ही कंपनी निर्माता-दिग्दर्शन क्षेत्रात काम करत असल्याचे सांगितले होते.
यावेळी कवल शर्मा चार्ली-2 या नाटकाच्या प्रोडेक्शनचे काम करत होते. त्यांनी तिला या नाटकात काम करण्याची ऑफर दिली होती, मात्र तिला नाटकात काम करण्याची इच्छा नसल्याने त्यांना नकार दिला होता. दोन वर्षांपूर्वी खार येथील एका कार्यक्रमांत तिची कवल शर्माशी पुन्हा भेट झाली होती. यावेळी त्यांनी तिला टिव्हीसह फिल्म शोमध्ये एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. त्यांनी तिला गुंतवणुकीचा सल्ला देताना तिला चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने त्यांच्यासोबत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ऑगस्ट 2024 रोजी कवल शर्माने तिला फोन करुन त्यांची कंपनीकडून लक बाय एक्सचेंज या दोन मित्रांच्या जीवनातील कथेवर आधारीत वेबसिरीज आणि बिरुबाला नॅशनल हिरो या चित्रपटाच्या निर्मितीबाबत विचारणा करुन तिला गुंतवणुक करण्यास सांगितले होते.
सात महिन्यांत वेबसिरीजसह चित्रपटाचे काम पूर्ण होणार असून त्यात 50 ते 60 लाखांची गुंतवणुक केल्यास तिला सात महिन्यांत एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांचा प्रस्ताव आवडल्याने तिने त्यांच्यासोबत काम करण्यास तसेच त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांनी तिची रायटर अमन झा, रशिदा खान आणि संदीप गणपत यांच्याशी ओळख करुन दिली होती. तसेच लवकरच वेबसिरीज आणि चित्रपटाचे शूटींग सुरु होणार असल्याचे सांगितले होते. ठाल्याप्रमाणे ऑगस्ट 2024 ते एप्रिल 2025 तिने त्यांना टप्याटप्याने 71 लाख 50 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर ती अधूनमधून त्यांच्या कार्यालयात जाऊन वेबसिरीज आणि चित्रपटाबाबत विचारणा करत होती. यावेळी त्यांनी तिला शूटींग सुरु असल्याचे सांगितले.
मात्र सात महिन्यांत त्यांनी शूटींग पूर्ण केले नाही. त्यामुळे मे 2025 रोजी तिने त्यांच्याकडे पुन्हा विचारणा केली होती. यावेळी त्यांच्याकडून तिला प्रतिसाद मिळाला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे त्यांनी तिला अडीच लाखांचे प्रत्येकी दोन तर 52 लाखांचा एक धनादेश दिला होता. मात्र बँकेत पुरेशी रक्कम नसल्याने ते तिन्ही धनादेश न वटता परत आले होते. याबाबत तिने त्यांना सांगितले असता ते तिला टाळण्याचा प्रयत्न करु लागले होते. वारंवार पैशांची मागणी करुनही कवल शर्मा यांनी तिची गुंतवणुक रक्कम आणि त्या रक्कमेवरील परताव्याची रक्कम परत केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात तिने त्यांच्याविरुद्ध खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कवल शर्मा याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.