घाटकोपर येथील वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश
चोरीच्या उद्देशाने हत्या करणार्या सावत्र सूनेला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 नोव्हेंबर 2025
मुंबई, – घाटकोपर येथे राहणार्या शहनाज अनिस काझी या 65 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात घाटकोपर पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या उद्देशाने हत्या करणार्या सावत्र सूनेला पोलिसांनी अटक केली असून तिने या हत्येची कबुली दिली आहे. मुमजाज इरफान खान असे या सूनेचे नाव असून अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत आरोपी महिलेस अटक करुन पोलिसांनी हत्येचा पर्दाफाश केला आहे.
घाटकोपर येथील हिमालय सोसायटी परिसरातील मुकूंद सोसायटीच्या ए विंगच्या ए/तेरामध्ये शहनाज काझी ही वयोवृद्ध महिला एकाकी जीवन जगत होती. तिच्या पतीने दोन लग्न केले होते, मात्र पतीच्या निधनानंतर ती सात वर्षांपासून एकटीच राहत होती. गुरुवारी शहनाजची बहिण नेहा ऊर्फ मीना कोलगावकर हिने तिला कॉल केला होता, मात्र वारंवार कॉल करुनही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने तिसर्या मजल्यावर राहणार्या सायका रईस अन्सारी या महिलेस तिथे जाऊन चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे सायका ही शहनाजकडे गेली होती, मात्र फ्लॅट आतून बंद होते. दरवाजा ठोठावून तिने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर तिने शेजारी राहणार्या पंडित यांच्याकडून तिच्या फ्लॅटची चावी घेतली होती.
तिने चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यावेळी तिला शहनाज या बेडरुममध्ये बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हा संशयास्पद वाटताच तिने सोसायटीच्या पदाधिकार्यांसह घाटकोपर पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. शहनाज यांना जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात शहनाजच्या घरात प्रवेश केलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यात जड वस्तूने बेदम मारहाण करुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर घाटकोपर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना एक संशयित महिला दिसून आली. या महिलेचा शोध घेत असताना अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त राकेश ओला, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस निरीक्षक रेवणसिद्ध ठेंगले, अशरुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तिरमारे, खरमाटे, पोलीस उपनिरीक्षक पलसे, पांडुरंग साळुंखे व अन्य पोलीस पथकाने मुमताज खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत मुमताज ही शहनाजची सावत्र सून असून तीच तिच्या घरी आली होती. चोरीच्या उद्देशाने तिनेच तिची गंभीर जखमी करुन हत्या केल्याची कबुली दिली. या हत्येनंतर तिने घरातील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. तिने स्वतची ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन तिला अवघ्या काही तासांत पोलिसांनी अटक केली. चोरीच्या उद्देशाने तिने शहनाज काझी हिची हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून चोरीचे सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.