जेवत नाही म्हणून मुलाला वायरसह डॉगिज बेल्टने अमानुष मारहाण
मारहाणप्रकरणी जन्मदात्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 नोव्हेंबर 2025
मुंबई, – जेवताना नाटक करतो, वेळेवर जेवत नाही म्हणून रागाच्या भरात जन्मदात्या पित्यानेच स्वतच्या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला वायरसह डॉगिजच्या बेल्टने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, अल्पवयीन न्याय कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचे आई-वडिल वेगवेगळे राहत असून आईने व्हिडीओ कॉल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेची सहार पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे. आरोपी पित्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
27 वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरीतील ओल्ड नागरदास रोडवरील एका निवासी इमारतीमध्ये राहते. 2016 साली तिचे एका तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता. एप्रिल 2019 रोजी त्यांना एक मुलगा झाला होता. सध्या तो सहा वर्षांचा आहे. दोन वर्षांपूर्वी कौटुंबिक वादातून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. तो तिला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होता. सतत होणार्या भांडणातून त्याने तिला घरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र मुलाला सोबत नेण्यास नकार दिला. तिने तसे केल्यास त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती तिच्या मुलाला त्याच्याकडे सोडून तिच्या माहेरी निघून गेली होती.
आठवड्यातून एक दिवस तिचा मुलगा तिच्याकडे येत होता. यावेळी तिला तो त्याच्या वडिलांसोबत सहारगाव परिसरात राहत असल्याचे समजले होते. 25 नोव्हेंबरला तिने तिच्या मुलाला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्याने त्याचे कपडे काढून त्याला वडिलांनी बेदम मारहाण केल्याच्या जखमा दाखविल्या होत्या. या जखमा पाहिल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने तिच्या पतीला फोन करुन याबाबत जाब विचारला होता. मात्र त्याने तिला प्रतिसाद न देता तिचा कॉल बंद केला होता.
गुरुवारी 27 नोव्हेंबरला ती सहारगाव येथील तिच्या घरी गेली होती, यावेळी तिथे तिचा पती आणि मुलगा नव्हता. आजूबाजूला विचारपूस केल्यानंतर तिला तिचा मुलगा एका महिलेकडे दिसला. त्यानंतर तिने त्याची आपुलकीने चौकशी केली होती. यावेळी त्याने जेवण करत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी वायरसह डॉगिजच्या बेल्टने त्याला बेदम मारहाण केल्याचे सांगितले. तिने त्याचे कपडे काढले असता त्याच्या शरीरावर वायरसह बेल्टचे चट्टे दिसून आले.
त्यानंतर ती मुलासोबत सहार पोलीस ठाण्यात आली. तिथे तिने उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी पित्याविरुद्ध स्वतच्याच सहा वर्षांच्या मुलाला जेवण करत नाही म्हणून वायरसह डॉगिजच्या बेल्टने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी पित्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.