बोरिवली रेल्वे स्थानकात सापडलेल्या निनावी बॅगेमुळे तणाव

बॅगेतील साडेसात लाखांची दागिने-कॅश मूळ मालकाच्या ताब्यात

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – बोरिवली रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी सापडलेल्या बेवारस बॅगेमुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कस्तुरबा मार्ग पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकासह बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे तिथे उपस्थित पोलिसांसह रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. या बॅगेत पोलिसांना साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने आणि कॅश सापडली, ही बॅग नंतर प्रदीप नानूभाई दोशी या 70 वर्षांच्या वयोवृद्धाच्या स्वाधीन करण्यात आली. रेल्वे स्थानकात प्रदीप दोशी बॅग ठेवून घाईघाईने निघून गेल्याचे तपासात उघडकीस आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज इनामदार यांनी सांगितले.

दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर देशभरातील सर्वच प्रमुख शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. त्यात 6 डिसेंबरला अयोध्येतील बाबरी मशिद पतनासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचा महानिर्वाणदिन असल्याने पोलीस आयुक्तांनी सर्वच पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना दिली होती. परिसरात जास्तीत जास्त गस्त आणि नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांनी गस्त आणि नाकाबंदीवर अधिक भर दिला आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता बोरिवली रेल्वे स्थानकात एक बेवारस बॅग पडली असल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिसांना मिळाली होती. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या माहितीनंतर पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज इनामदार यांच्यासह अन्य पोलीस पथक, बॉम्बशोधक व नाशक पथकातील अधिकारी श्वान पथकासोबत घटनास्थळी रवाना झाले होते. यावेळी संपूर्ण परिसर रिकामा करुन या पथकाने बँगेची तपासणी केली होती. मात्र बॅगेत काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

बॅगेत मिळालेल्या कागदपत्रांवरुन पोलिसांनी एका व्यक्तीला कॉल केला होता. हा व्यक्ती गुजरात बडोदाचा रहिवाशी असून त्याचे आजोबा प्रदीप दोशी हे एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. बोरिवली रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर ते कांदिवलीतील पोयसर परिसरात निघून गेले होते. घाईघाईने ते त्यांची बॅग तिथेच विसरुन गेले होते. त्यानंतर प्रदीप दोशी यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन पोलिसांनी त्यांना संपर्क साधला होता. त्यांना कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले.

पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांची बॅग त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. या बॅगेत पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि कॅश असा साडेसात लाखांचा मुद्देमाल होता. हा मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज इनामदार यांचे आभार व्यक्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page