फसवणुकीसह लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत अपंग रिक्षाचालकाला कारावास

वयोवृद्ध महिलेची फसवणुक करुन लैगिंक अत्याचार करुन लुटमार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – तुमच्या मुलाचे एका मुलीशी लग्न ठरले असून ते कुठल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे हे मला माहीत आहे असे सांगून एका 75 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला विरारजवळील जंगलात आणून तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन लुटमार केल्याचा आरोप असलेल्या आरोपी रिक्षाचालकाला विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून दहा वर्षांच्या कारावासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिग्नेश जितेंद्र राजानी असे या 40 वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो अपंग आहे. गुन्हा घडल्यानंतर कुठलाही पुरावा नसताना त्याला अटक करुन त्याच्याविरुद्ध निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय लिंगाडे यांनी सबळ पुराव्यासहीत आरोपपत्र सादर केले होते. या पुराव्यासह साक्षीदारांच्या जबानीवरुन आरोपीला शिक्षा झाल्याचे सांगण्यात आले.

पिडीत महिला 75 वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियांसोबत दहिसर येथे राहत होती. याच परिसरातील काही घरांमध्ये ती घरकाम करत होती. सात वर्षांपूर्वी काम करुन ती घराच्या दिशेने जात होती. यावेळी तिथे एका रिक्षातून जिग्नेश राजानी आला. त्याने पिडीत मुलीला तिचा मुलगा एका मुस्लिम तरुणीशी लग्न करत आहेत. तो कुठल्या हॉटेलमध्ये राहतो असे मला माहित आहे. तुम्ही ताबडतोब चला आणि मुलाला लग्न करण्यापासून वाचवा, नाहीतर त्याचे आयुष्य बर्बाद होईल असे सांगितले. त्याच्या बतावणीला भुलून ती त्याच्यासोबत रिक्षातून निघाली. काही वेळानंतर जिग्नेश तिला घेऊन विरारजवळील एका जंगलात घेऊन आला. तिथेच त्याने पिडीत वयोवृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार केला. तिच्या अंगावरील दागिने आणि कॅश असा मुद्देमाल चोरी करुन त्याने पलायन केले होते.

या घटनेनंतर पिडीत महिला दहिसर येथे आली आणि तिने एमएचबी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध 376, 420, 394 भारतीय दंड सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय लिंगाडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन जिग्नेश राजानी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच पिडीत वयोवृद्ध महिलेची फसवणुक करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन लुटमार केल्याची कबुली दिली होती.

या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध तपास पूर्ण करुन पोलीस निरीक्षक धनंजय लिंगाडे यांनी विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची निमित सुनावणी कोर्टात सुरु होती. अलीकडेच ही सुनावणी पूर्ण झाली आणि कोर्टाने जिग्नेशला तिन्ही कलमांतर्गत दोषी ठरविले होते. त्यापैकी लैगिंक अत्याचाराच्या कलमांतत्याला दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजाराचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास, लुटमारीच्या कलमांतर्गत सात वर्षांच्या सक्तमजुरीसह दोन हजारचा दंंड, दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून महाजन यांनी काम पाहिले तर पोलीस निरीक्षक धनंजय लिंगाडे यांनी गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, महिला पोलीस हवालदार पेडणेकर, सातपुते आणि महिला पोलीस शिपाई माळी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page