भूणादेव ज्वेलर्स शॉपमध्ये झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश

तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दुकलीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 डिसेंबर 2025
मुंबई, – ऑगस्ट महिन्यांत दहिसर परिसरातील भूणादेव ज्वेलर्स शॉपमध्ये झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश दहिसर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दोन रेकॉर्डवरील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. जगनसिंग तारासिग कल्याणी ऊर्फ कलानी ऊर्फ पाजी आणि हनुमंत बापूराव तांबे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही नांदेड आणि बीडचे रहिवाशी आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दहिसर परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे भूणादेव ज्वेलर्स नावाचे एक शॉप कोकणीपाडा, एस. एन दुबे रोडवर आहे. 18 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने लोखंडी जाळीच्या दरवाज्याला लावलेले लॉक तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील चांदीचे पैजण, चैन, ब्रॅसलेट, कडे, छल्ला, जोडवी, बिछवा, कंबर साखळी, गणपतीसह लक्ष्मी मातेची मूर्ती असा 24 किलो 525 ग्रॅमव वजनाचे 23 लाख 39 हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.

दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. परिसरातील शंभर ते सव्वाशे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन तांत्रिक माहितीवरुन जगनसिंग कल्याणी आणि हनुमंत तांबे या दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. यातील जगनसिंग हा नांदेडच्या गुरुद्वारा नंबर गेट तर हनुमत हा बीडच्या पाटोदा, हनुमानवाडी, महासांगवीचा रहिवाशी आहे.

दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. यातील जगनसिंगविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात तीन, वर्तकनगर, मुलुंड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, कळवा, परली, नौपाडा, कापूरबावडी, ओढाव, नारंगपुरा (गुजरात) पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा दहा तर हनुमंतविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात आठ आणि जामखेड पोलीस ठाण्यात एक गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांनाही अलीकडेच काशिमिरा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून दहिसर येथील भूणादेव ज्वेलर्स घरफोडीचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर त्यांचा ताबा काशिमिरा पोलिसांकडून घेण्यात आला होता.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लहाने, जिनपाल वाघमारे, इर्शाद सय्यद, अंकुश दांडगे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली खरात, पोलीस उपनिरीक्षक सतपाल बोधे, ओमप्रकाश कावळे, संतोष खरडे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा पाटील, सहाय्यक फौजदार राजू नार्वेकर, पोलीस हवालदार कालासो, भाट, सय्यद, फडतरे, जाधव, चुंगीवाडीयार, पोलीस शिपाई आव्हाड, शनवार, पंडीत, पाटील, जाधव, चौधरी, राणे, महाले, विटकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page