शिखा अॅकडमीमध्ये नोकरीसह मुलांना प्रवेश देण्याच्या नावाने गंडा
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपी महिलेस अकरा महिन्यांनी अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 डिसेंबर 2025
मुंबई, – बोरिवलीतील सुमेरनगर परिसरात असलेल्या शिखा अॅकडमी या नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीसह तीन मुलांच्या प्रवेशाच्या नावाने गंडा घालणार्या एका आरोपी महिलेस अकरा महिन्यानंतर बोरिवली पोलिसांनी अटक केली. करिश्मा जितेश मेहता असे या महिलेचे नाव असून तिने नोकरीसह मुलांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या 2 लाख 65 हजाराचा अपहार केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
आरती विजय पाटील ही महिला बोरिवली परिसरात राहत असून खाजगी शिकवणी घेते. मार्च 2024 रोजी तिची चुलती स्मिता राजू भालेकर हिच्या बोरिवलीतील सुमेरनगर येथील घरी गेली होती. तिथेच तिची ओळख करिश्मा मेहताशी झाली होती. यावेळी करिश्माने तिची मुलगी दहावीत शिकत असून तिचा घरी येऊन क्लास घेण्याची विनंती केली होती. तिने होकार दिल्यानंतर दुसर्या दिवसांपासून ती तिच्या घरी तिच्या मुलीच्या खाजगी शिकवणीसाठी जात होती.
याच दरम्यान करिश्माने ती शिखा अॅकडमी स्कूल फ्रिलान्सर बीएमसी एजंट असल्याचे सांगून तिथे तिला शिक्षिकेची नोकरीसह तिच्या मुलाला अॅडमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यास तिने होकार दिला होता. ऑगस्ट 2024 रोजी करिश्माने तिचे वैयक्तिक आणि शैक्षणिक कागदपत्रे घेतले होते. तसेच नोकरीसाठी काही पैसे घेतले होते. याच दरम्यान तिचे चुलते राजू तुकाराम भालेकर यांनी करिश्माला त्यांच्या दोन मुलांचे शिखा अॅकडमीमध्ये प्रवेश देण्याची विनंती केली होती. या प्रवेशासाठी त्यांनी तिला दिड लाख रुपये दिले होते.
अशा प्रकारे करिश्माने आरती पाटील यांच्या नोकरीसह तीन मुलांना शिखा अॅकडमीमध्ये प्रवेश देण्यासाठी टप्याटप्याने 2 लाख 65 हजार रुपये दिले होते. या पेमेंटनंतर तिने त्यांना शाळेत फी भरल्याची पावती दाखविली होती. मात्र दिलेल्या मुदतीत तिने तिला नोकरी तसेच तिन्ही मुलांना शाळेत प्रवेश दिला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी शिखा अॅकडमीमध्ये जाऊन चौकशी केली होती. यावेळी तिथे कुठलीही नोकरी नसल्याचे तसेच तिने शाळेत प्रवेश घेतलेल्या फी पावती बोगस असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी करिश्माला जाब विचारुन तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र तिने पैसे दिले नाही. पैशांसाठी कॉल केल्यानंतर ती विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच आरती पाटील हिने बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून करिश्मा मेहताविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी शाळेच्या बोगस पावत्या बनवून शाळेत नोकरी देण्यासह तीन मुलांना प्रवेश देण्याच्या आमिषाने पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अकरा महिन्यानंतर करिश्माला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर तिला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.