फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड बिल्डर पिता-पूत्रांना अटक
दोन वर्षांपासून फरार असलेले दोघेही केरळ येथे सापडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड बिल्डर पिता-पूत्रांना अखेर कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. मिहीर अशोक जेठवा आणि अशोक अरविंद जेठवा अशी या दोघांची नावे आहेत. विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होताच ते दोघेही गेल्या दोन वर्षांपासून फरार होते, अखेर या दोघांनाही केरळ येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जेठवा पिता-पूत्र रेकॉर्डवरील व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध दहाहून अधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असून या गुन्ह्यांत त्यांनी सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
जेठवा पिता-पूत्र हे व्यवसायाने बिल्डर असून त्यांची स्वतची त्रिवेणी डेव्हलपर्स नावाची एक कंपनी आहे. या कंपनीने विविध ठिकाणी इमारत बांधकामाचे प्रोजेक्ट हाती घेतले होते. त्यांनी अनेकांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यास सांगून त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. इतकेच नव्हे तर काहींना त्यांच्या प्रोजेक्टच्या इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांच्या कंपनीत अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. बोरिवलीतील रहिवाशी नवीनचंद्र गोरधनदास भरखडा यांनी त्यांच्या कंपनीत 31 मार्च 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत एक कोटी सतरा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना टक्के व्याजदर किंवा फ्लॅट देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
मात्र त्यांना दिलेल्या मुदतीत त्यांनी व्याजासहीत मुद्दल रक्कम दिली नाही किंवा फ्लॅट दिला नव्हता. पैशांचा अपहार करुन जेठवा पिता-पूत्र पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नवीनचंद्र भरखडा यांच्या तक्रारीवरुन कस्तुरबा मार्ग पोलिसांनी मिहीर जेठवा आणि अशोक जेठवा या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. तपासादरम्यान या दोघांनी तक्रारदारासह अनेक सर्वसामान्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अशाच काही गुन्ह्यांची नोंद होती.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांचे विशेष पथक महाराष्ट्रासह दमन, गुजरात, तामिळनाडू, चेन्नई आणि कर्नाटक येथे गेले होते. मात्र प्रत्येक वेळेस ते दोघेही पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत होते. तरीही पोलिसांनी त्यांचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मिहीर आणि अशोक जेठवा हे दोघेही केरळ शहरात स्वतचे अस्तित्व लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील, सरला थोरात, दया पवार, जिनपाल वाघमारे, संदीपान उबाळे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत भिसे व अन्य पोलीस पथकाने केरळ शहरात त्यांचा शोध सुरु केलाद होता. यावेळी या दोघांनाही कोचीच्या एर्नाकुलम परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
तपासात फसवणुकीच्या गुन्ह्यांतील ते दोघेही वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर बुधवारी दुपारी दोघानाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात ते दोघेही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.
त्यांच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात पाच, बोरिवली पोलीस ठाण्यात चार तर एमएचबी पोलीस ठाण्यात एक अशा दहाहून अपहार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या पाचही गुन्ह्यांत त्यांची कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यानंतर त्यांना बोरिवली आणि एमएचबी पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे. फसवणुकीची रक्कम त्यांनी कुठे गुंतवणुक केली आहे, या गुन्ह्यांत त्यांना इतर कोणी मदत केली का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.