ड्रग्ज तस्करीच्या दोन गुन्ह्यांत पती-पत्नीसह चौघांना अटक
दोन्ही कारवाईत अडीच कोटीचा हेरॉईनचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – गेल्या चार दिवसांत ड्रग्ज तस्करीच्या दोन वेगवेगळ्या कारवाईत कांदिवलीतील अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी चारजणांच्या टोळीस अटक केली. त्यात एका पती-पत्नीसह दोन ड्रग्ज पेडलरचा समावेश आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी सुमारे अडीच कोटीचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. या चौघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकात काहीजण हेरॉईन या ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्याासाठी सोमवारी कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक, पोलीस उपनिरीक्षक शेळके, पाटील, सहाय्यक फौजदार निकम, पोलीस हवालदार भरत मोहिते, सुधाकर देसाई, पोलीस शिपाई नरेंद्र रोकडे, मेहबूब तांबोळी, अविनाश गालवे, रुपेश गिंबल, अभिषेक कानाडे आणि राहुल वाळवे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
यावेळी तिथे आलेल्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत ते दोघेही पती-पत्नी असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोन कोटी चार लाख रुपयांचा हेरॉईनचा साठा सापडला होता. या ड्रग्जसहीत त्यांच्याकडील दोन मोबाईल आणि मिक्सर ग्राईडर पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईपूर्वी याच पथकाने बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, नॉर्थ परिसरातून दोन तरुणांना ताब्यात घेतले होते. ते दोघेही पनवेलच्या कळंबोलीचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 123 ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि 5 लाख 87 हजार रुपयांची कॅश जप्त केली होती. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 49 लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत पोलिसांनी ड्रग्जसहीत 55 लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता. ते चौघेही तिथे हेरॉईनच्या डिलीव्हरीसह विक्रीसाठी आले होते, मात्र त्यापूर्वीच या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, तिथे ते कोणाला देण्यासाठी आले होते, त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली आहे का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.