मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा होईल या आमिषाला बळी पडून एका व्यावसायिकाची अज्ञात व्यक्तीने सुमारे सव्वासहा लाखांची फसवणुक केल्याची घटना खार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून खार पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. या गेमच्या माध्यमातून संबंधित आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीचा हा नवीन फंडा असल्याचे बोलले जाते.
राहुल मनोहर मुलचंदानी हे व्यावसायिक असून त्यांचा इलेक्ट्रॉनिक शोरुम आहे. खार परिसरात राहणारे राहुल यांचा राहुल इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड नावाचा शोरुम आहे. 27 ऑक्टोंबरला त्यांचे काका सुरज मुलचंदानी यांनी त्यांच्या व्हॉटअपवर एक लिंक पाठविली होती. ही मॅकएमजीएम नावाच्या गेमची लिंक होती. हा गेम खेळल्यास त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल असे त्यांनी त्यांना सांगितले होते. मात्र त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. काही दिवसांनी त्यांच्या काकांनी गेम खेळायचे असल्याचे सांगून त्यांना गेमचा आयडी आणि पासवर्ड लॉगिंन करुन दिे होते.
गेममध्ये सहभागी होण्यासाठी आधी पैशांची गुंतवणुक करणे अर्निवार्य होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून गेमसाठी 27 ऑक्टोंबर आणि 28 ऑक्टोबर असे दोन दिवस सलग 6 लाख 26 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र गेम पूर्ण करुनही त्याां कुठलाही परतावा मिळाला नाही. त्यांच्या खात्यात मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम जमा झाली नव्हती. त्यांनी संबंधित व्यक्तीला वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही.
यावेळी एकाने त्यांना आणखीन 35 टक्के रक्कम जमा करण्याचा सल्ला दिला. ही रक्कम जमा होताच त्यांची रक्कम त्यांच्या बॅक खात्यात जमा होईल असे सांगितले. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघडकीस येताच त्यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे संबंधित गेमच्या पदाधिकार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.