कर्तव्य बजाविणार्या पोलिसांशी पंगा घेणे महागात पडले
पितापूत्रासह चौघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – सरकारी कर्तव्य बजाविणार्या पोलिसांशी वाद घालून पंगा घेणे चारजणांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध शिवाजी पार्क आणि मालवणी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यात एका पिता-पूत्राचा समावेश असून त्यांनी पोलिसांनी कॉलर पकडून एका पोलीस कर्मचार्याला बेदम मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे तर इतर दोघांना कारवाई करुन नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
अभिषेक दत्तात्रय शिंदे हे माहीम परिसरात राहत असून सध्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजता दादर येथील रानडे रोड, लिना बारसमोर काहीजण गोंधळ घालत असल्याचा कॉल पोलिसांना प्राप्त झाला होता. या माहितीनंतर पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी तिथे युवराज गंगाराम जाधव आणि आकाश सुरेश पंडागळे हे दोघेही मद्यप्राशन करुन बार मॅनेजर राकेश कृष्णा शेट्टी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे या दोघांनाही शांतता राखण्याची समज देऊन त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले.
मात्र पोलिसांना पाहून या दोघांनी अभिषेक शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचार्यांचे कॉलर पकडून धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. त्यात पोलीस नाईक झेंडे आणि पोलीस शिपाई बरेवाड यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. या दोघांची समजूत घालूनही ते पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत कारवाई केल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
दुसरी घटना सोमवारी रात्री पाऊणच्या सुमारास मालाडच्या मालवणी, गेट क्रमांक सात, बीट चौकी दोनमध्ये घडली. कुमार भिमराव गायकवाड हे कल्याण येथे राहत असून सध्या मालवणी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. सोमवारी रात्री ते त्यांच्या सहकार्यासोबत गेट क्रमांत सात, बीट क्रमांक दोनजवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी तिथे पियुष कोटक व त्याचा मुलगा राहिल कोटक यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
राहिलने वैभव पाटील या अंमलदाराची कॉलर पकडून त्यांना हाताने मारहाण केली होती. त्यांच्या बचावासाठी गेलेल्या सहकार्यांना अश्लील शिवीगाळ व धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर कुमार गायकवाड यांच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी आरोपी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.