पोर्न व्हिडीओ दाखवून 21 वर्षांच्या तरुणीचा विनयभंग
अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – कामावरुन घरी जाणार्या एका 21 वर्षांच्या तरुणीला पोर्न व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी 25 वर्षांच्या अज्ञात तरुणाविरुद्ध माटुंगा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
21 वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या कुटुंबियांसोबत दादर परिसरात राहत असून मालाड येथील एका स्टुडिओमध्ये कामाला आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. दिवसभर काम करुन रात्री पावणेबारा मालाड येथून दादर रेल्वे स्थानकात आली होती. दादर रेल्वे स्थानकातून स्कायवॉकवरुन जात असताना नपू रोड, हिंदू कॉलनी लेन क्रमांक दोनजवळून जात असताना अचानक एका व्यक्तीने तिला दीदी अशी हाक मारली. त्यामुळे तिने मागे वळून पाहिले असता एक तरुण तिच्याजवळ आला.
त्याच्या हातात मोबाईल होता. या मोबाईलवर त्याने पोर्न व्हिडीओ लावला होता. हा पोर्न व्हिडीओ तिला दाखवून तो पळून गेला होता. या प्रकाराने तिला प्रचंड धक्का बसला होता. तिने आरडाओरड करुन त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. काही वेळानंतर ती घरी आली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या आईसह भावाला सांगितला. त्यांनी संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर ते सर्वजण माटुंगा पोलीस ठाण्यात आले आणि तिथे उपस्थित पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगितला. या तरुणीच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेचे आदेश माटुंगा पोलिसांना दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.