निवासी इमारतीवरुन उडी घेऊन विवाहीत महिलेची आत्महत्या
पतीसह सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपविल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 डिसेंबर 2025
मुंबई, – जोगेश्वरीतील एका पॉश निवासी इमारतीच्या अकराव्या व्या मजल्यावरुन उडी घेऊन सृष्टी अमीत जैन नावाच्या एका 30 वर्षांच्या महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाला सात वर्ष उलटूनही मूलबाळ होत नसल्याने तिचा तिच्या पतीसह सासर्याकडून मानसिक व शारीरिक शोषण सुरु होते, या छळामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी सांगितले. दरम्यान सृष्टीचा मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ही घटना बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजता जोगेश्वरीतील मसाजवाडी बसडेपोजवळील ओबेरॉय स्पेंडर या पॉश अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या अकराव्या मजल्यावर सृष्टी ही तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. सात वर्षांपूर्वी तिचे हिरे व्यापारी असलेल्या अमीत जैनशी विवाह झाला होता. विवाहाच्या सात वर्षांनंतरही त्यांना मूळबाळ झाले होते. याच कारणावरुन सृष्टी आणि अमीत यांच्यात अनेकदा खटके उडत होते. तिला पतीसह सासर्याकडून टोमणे मारले जाते. त्यांच्याकडून तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण सुरु होते.
या छळाला ती कंटाळून गेली होती. याबाबत तिने तिच्या कुटुंबियांना सांगितले होते. छळामुळे तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजता तिच्या बेडरुमच्या बाल्कणीतून अकराव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी मेघवाडी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या सृष्टीला पोलिसांनी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. मात्र सृष्टीचा मूळबाळ होत नसल्याने, कौटुंबिक कारणावरुन तिचा पती आणि सासर्याकडून मानसिक व शारीरिक छळ सुरु होता. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्येचा निर्णय घेऊन स्वतचे जीवन संपविल्याचे बोलले जाते. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तिच्या पालकांसह नातेवाईकांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर दोषीवर योग्य ती कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे सृष्टीच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.