सीआरपीएफमध्ये हवालदार म्हणून नोकरी देण्याच्या आमिषाने गंडा
बेस्ट वाहकाची फसवणुक करणार्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – सीआरपीएफमध्ये हवालदार म्हणून नोकरीच्या आमिषाने एका बेस्ट वाहकाची तीनजणांच्या टोळीने फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्फराज सलमानी, निलेश सरोदे आणि योगेशकुमार शुक्ला अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी तक्रारदारांना त्यांची सीआरपीएफमध्ये नोकरीचे नियुक्तीसह प्रशिक्षणाचे बोगस लेटर देऊन विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
36 वर्षांचे तक्रारदार महेश पंढरीनाथ देवकर हे नवी मुंबईतील कामोठे परिसरात राहतात. 2019 पासून ते कंत्राटी स्वरुपात बेस्टमध्ये वाहक म्हणून काम करतात. नोकरी करताना ते शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होते. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख निलेशशी करुन दिली होती. निलेशच्या परिचित काही लोक असून ते सरकारी नोकरीसाठी त्याच्यासाठी प्रयत्न करतील असे सांगितले. सीआरपीएफमध्ये काही जागा असून तिथे त्याला हवालदार म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान त्याने त्यांची ओळख सर्फराजशी करुन दिली होती. तोच त्याचे शासकीय नोकरीचे काम करणार असून त्यसाठी त्याला आधी एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. सरकारी नोकरी मिळत असल्याने त्यांनी त्यांना एक लाख रुपये दिले होते.
काही दिवसांनी सर्फराजने त्यांना दिल्लीतील कॅर्नाक प्लेस, बाबा खरक सिंग येथील डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी येण्यास सांगितले होते. त्यामुळे 21 ऑगस्ट 2022 रोजी ते दिल्लीत गेले होते. या ठिकाणी त्यांची योगेशकुमारशी ओळख करुन देण्यात आली. त्यांना योगेशकुमारसोबत मेडीकलसाठी पाठविण्यात आले. मात्र त्यांची मेडीकल न करता डॉक्टरला मॅनेज केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्यांना सीआरपीएफमध्ये हवालदार म्हणून नियुक्ती झाल्याचे अपॉईटमेंट लेटर दिले. लवकरच त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार असल्याचे सांगून सर्फराजने त्यांच्याकडे तीन लाखांची मागणी केली होती.
मात्र पैसे नसल्याने ते दोघेही मुंबईत आले होते. काही दिवसांनी सर्फराजसोबत महेश देवकर हे दिल्लीच्या शास्त्री भवन येथील केंद्रीय सचिवालय कार्यालयात गेले होते. यावेळी त्याने त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला टप्याटप्याने आणखीन साडेतीन लाख रुपये दिले होते. तिथे त्यांना ट्रेनिंगचे लेटर देण्यात आले. काही दिवस त्यांनी त्यांना कॉल केला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांना कॉल करुन नोकरीविषयी विचारणा सुरु केली, मात्र त्यांनी त्यांचे कॉल घेतले नाही. नोकरीचे काम होत नसेल तर माझे पैसे परत करा असे त्यांनी सर्फराज आणि निलेशला सांगितले. यावेळी त्यांनी त्याला 50 हजाराचा एक धनादेश दिला, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यांनी दिलेले नोकरीसह प्रशिक्षणाचे लेटर बोगस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.
शासकीय नोकरीच्या नावाने या तिघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी चुन्नाभट्टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सर्फराज, निलेश आणि योगेशकुमार या तिघांविरुद्ध पोलिसांनी बोगस शासकीय लेटर देऊन नोकरीसाठी घेतलेल्या साडेचार लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांना नोकरीच्या आमिषाने गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.