मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 डिसेंबर 2025
मुंबई, – मिक्सर ट्रकच्या धडकेने नाजनिन खान या 20 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मिक्सर ट्रक चालक सिकंदर रामचंद्र पंडित याच्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता जोगेश्वरीतील अग्रवाल इस्टेट रोड, लोटस ग्रॉडुअर इमारतीसमोर झाला.
मोहम्मद हाफिज हबीबउल्ला तन्वर हा अंधैरी येथे राहत असून सेल्समन म्हणून कामाला आहे. सध्या तो मालाडच्या इन्फिनिटी मॉलमधील एका शॉपमध्ये काम करतो. गेल्या वर्षी तो अंधेरीतील एका शॉपमध्ये कामाला होता. तिथे एक महिन्यांसाठी गोरेगाव येथील लॉर्डस कॉलेजमधून दोन तरुणी इंटनशीपसाठी कामाला आल्या होत्या. तयात नाजनिन खान हिचा समावेश होता. तिच्याशी ओळख झाल्यानंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. अनेकदा नाजनिन कॉलेज सुटल्यानंतर त्यांना भेटायला अंधेरी येथे येत होती. त्यानंतर ते त्यांच्या बाईकवरुन आरे गार्डन तसेच वर्सोवा येथे फिरायला जात होते.
शुक्रवारी तेदोघेही वर्सोवा येथे फिरायला गेले होते. यावेळी तिच्या नाजनिनच्या आईने तिला कॉल करुन लवकर घरी येण्यास सांगितले होते. त्यामुळे ते दोघेही त्यांच्या बाईकवरुन विरा देसाई येथून जोगेश्वरीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. त्यांची बाईक लोटस ग्रॉडुअर इमारतीसमोरुन जात असताना एका मिक्सर ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. मिक्सर ट्रकच्या चाकाखाली आल्याने नाजनिन ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद हाफिज याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी चालक सिंकदर पंडित याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने मिक्सर ट्रक चालवून एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.