30 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी विक्रम भट यांच्यावर अटकेची कारवाई
विक्रम भटसह पत्नी श्वेताबंरी भटचा ताबा उदयपूर पोलिसांकडे
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 डिसेंबर 2025
मुंबई, – सुमारे तीस कोटीच्या फसवणुकीप्रकरणी निर्माता दिग्दर्शक विक्रम भट आणि त्यांची पत्नी श्वेताबंरी भट या दोघांना वर्सोवा आणि उदयपूर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. अटकेनंतर लोकल कोर्टात हजर केल्यानंतर या दोघांनाही 9 डिसेंबरपर्यंत ट्रॉन्झिंट देण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांना पुढील कारवाईसाठी उदयपूर पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी राजस्थान येथे नेण्यात येणार आहे. अलीकडेच तेथील एका लोकल कोर्टात विक्रम भट यांच्यासह सहाजणांविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी केली होती, या नोटीसनंतर उदयपूर पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले होते, त्यानंतर या पोलिसांनी वर्सोवा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केल्याचे बोलले जाते.
यातील तक्रारदार डॉ. अजय मुरदिया हे राजस्थानचे रहिवाशी असून ते इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे मालक आहेत. त्यांना त्यांच्या दिवंगत पत्नीवर बायोपिक बनवायचा होता. त्यासाठी त्यांनी दिनेश कटारिया यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी त्यांची विक्रम भट यांच्याशी ओळख करुन दिली होती. विक्रम भट हे बॉलीवूडचे नामांकित निर्माता-दिग्दर्शक असून तेच त्यांच्या पत्नीवर एक चांगला बायोपिक चित्रपट बनवू शकतात असे सांगितले होते. 25 एप्रिल 2024 रोजी याच संदर्भात त्यांनी मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये विक्रम भट यांची भेट घेऊन त्यांच्याशी बायोपिकबाबत सविस्तर चर्चा केली होती. तसेच या बायोपिकसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विक्रम भट यांनी त्यांना होकार दिला होता. याकामी त्यांनी त्यांची पत्नी श्वेताबंरी आणि मुलगी कृष्णा या दोघही सहयोगी म्हणून सहभागी होतील असे सांगतले होते.
विक्रम भट यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने व्हीएसबी एलएलपी नावाची एक नोंदणीकृत कंपनी सुरु केली होती. विक्रम भट आणि श्वेताबंरी भट यांनी त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून दोनशे कोटीची कमाईचे आश्वासन देऊन त्यांना चित्रपट निर्मातीसाठी गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. काही दिवसांनी त्यांनी कंपनीच्या बँक खात्यात तीस कोटी ट्रान्स्फर केले होते. मात्र विक्रम भट यांनी चित्रपटाची निर्मिती केली नाही. चित्रपटासाठी दिलेल्या तीस कोटीचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच अजय मुरदिया यांनी तेथील लोकल कोर्टात एक याचिका दाखल करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंती केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना कोर्टाने भोपाळपुरा पोलिसांना संबंधितांवर गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर भोपाळपुरा पोलिसांनी विक्रम भट यांच्यासह इतर सहाजणांविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निर्माता दिग्दर्शक विक्रम भट, त्यांची पत्नी श्वेताबंरी विक्रम भट, मुलगी कृष्णा विक्रम भट, उदयपूरचे सहेलीनगरचे दिनेश कटारिया, ठाण्याचे निर्माता मेहबूब अन्सारी, दिल्लीतील रहिवाशी मुदित बुट्टन, डीएससी अध्यक्ष गंगेश्वरलाल श्रीवास्तव आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईजचे सरचिटणीस अशोक दुबे यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत या सर्वांवर लुक आऊट नोटीस जारी करणयात आले होत. तसेच त्यांना 8 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या आरोपींना कोर्टाच्या परवानगीशिवाय विदेशात जाण्यास मनाई करण्यात आली होती.
लुक आऊटनंतर उदयपूर पोलिसांचे एक विशेष पथक शनिवारी मुंबईत आले होते. या पथकाने वर्सोवा पोलिसांच्या मदतीने विक्रम भट आणि त्यांची पत्नी श्वेताबंरी भट यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना उदयपूर पोलिसांकडे ताबा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या दोघांचा ताबा उदयपूर पोलिसांना देण्यात आला. त्यांना पुढील कारवाईसाठी राजस्थान येथे नेण्यात आले आहे. चौकशीनंतर त्यांना तेथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.