मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 डिसेंबर 2025
कसारा, – जुलै महिन्यांत मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैतरणा धरणाच्या पुलाजवळ सापडलेल्या अज्ञात तरुणाची ओळख पटवून त्याच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करुन पळून गेलेल्या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. संतोष ऊर्फ अरुण लक्षमण धात्रक, शिवराम लक्ष्मण वाघ, गोकुळ पांडुरंग बेंडकोळी, गणेश बाळू बेंडकोळी आणि संजय संपत पोटकुले अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण नाशिकचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या सर्वांना मोखाडा पोलिसांकडे सोपविण्यात आले असून याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहे. कुठलाही पुरावा नसताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या हत्येतील पाचही आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले आहे.
12 जुलै 2025 रोजी नाशिकच्या कसारा पोलीस ठाण्यातून मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैतरणा धरणाच्या पुलावर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. या तरुणाची ओळख पटली नव्हती. त्याचे दोन्ही पाय जंगली वेलीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आले होते. या तरुणाचे फोटो सर्वच पोलीस ठाण्यात पाठवून त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. तपासादरम्यान मृत तरुणाचे शरद कोंडाजी बोडके असल्याचे उघडकीस आले.
शरद हा नाशिकच्या इगतपुरीचा रहिवाशी होता. त्याच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु होता. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वानखेडे, खोत, श्रीकांत दहिफळे, प्रतिक पोकळे व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु केला होता.
शरदच्या मोडाळे गावी केलेल्या तपासात काही महत्त्वाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी संतोष धात्रक, शिवराम वाघ, गोकुळे बेंडकोळी, गणेश बेंडकोळी आणि संजय पोटकुले या पाचजणांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत शरद हा संतोषला जमिनीच्या वादातून सतत धमकी देत होता. याच वादातून त्याने त्याच्या आई-वडिलांनी बेदम मारहाण केली होती तर त्याच्या मामाचे पाय मोडला होता. त्याचा संतोषला प्रचंड राग होता. याच रागातून त्याने शरदच्या हत्येची योजना बनविली होती. याकामी त्याने इतर चौघांची मदत घेतली होती.
ठरल्याप्रमाणे त्यांनी शरदला मद्यप्राशन करण्यासाठी बोलाविले होते. त्याला एका कारमधून जांभुळपाडा, त्र्यंबकेश्वर येथे आणून त्याला दारु पाजली होती. त्यानंतर त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन नंतर त्याची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह वैतरणा धरणाच्या पुलाजवळ पाण्यात टाकून हत्येचा पुरावा नष्ट करुन ते सर्वजण पळून गेले होते.
तपासात आलेल्या या माहितीनंतर या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना पुढील कारवाईसाठी मोखाडा पोलिसाकडे सोपविण्यात आले होते. या गुन्ह्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.