पोलीस ठाण्यात महिलेचा धिंगाणा घालण्याचा प्रयत्न
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 डिसेंबर 2025
मुंबई, – कुठलीही तक्रार न करता पोलीस ठाण्यात येऊन एका महिलेने पोलिसांना शिवीगाळ करुन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा मालवणी पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी सोना जहूर शेख या महिलेविरुद्ध पोलिसांनी पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.
विद्या तुकाराम करंडे या नवी मुंबईतील खारघर परिसरात राहत असून सध्या मालवणी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री त्या रात्रपाळीवर ड्यूटीवर हजर झाल्या होत्या. रात्री दिड वाजता पोलीस ठाण्यात सोना शेख नावाची एक महिला आली होती. तिने कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. यावेळी तिथे ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. यावेळी या महिलेस विद्या करंडे आणि पोलीस उपनिरीक्षक वैती यांनी शांत राहण्यास सांगून तिची कोणाविरुद्ध काही तक्रार आहे का याबाबत विचारणा केली होती.
मात्र तिने कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगून पोलीस ठाण्यात जोरजोरात आरडाओरड करुन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. तिथे उपस्थित पोलिसांना दारु पिऊन पोलीस ठाण्यात आलात का अशी विचारणा करुन उपनिरीक्षक वैतीसह महिला शिपाई करंडे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली होती. तसेच तिथे आलेल्या पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, इंगवले यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन त्यांना अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन तिला पोलीस ठाण्याबाहेर आणले. याप्रकरणी विद्या करंडे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोना शेख याच्याविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर अद्याप अटकेची कारवाई केली नसल्याचे सांगितले.