सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन महिलेची फसवणुक

अकरा लाखांना गंडा घालणार्‍या आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन अटकेची भीती दाखवून एका महिलेची सुमारे अकरा लाख रुपयांची फसवणुक करणार्‍या एका मुख्य आरोपीस पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अनिल राजूमल जैन असे या आरोपीचे नाव असून अशा प्रकारे फसवणुक करणारी एक सराईत टोळी आहे. या टोळीने सुप्रिम कोर्टाचे बोगस कागदपत्रे दाखवून मुंबईसह इतर शहरात अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. अटकेनंतर अनिल जैनला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

अंधेरी येथे तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. काही दिवसांपूर्वी तिला अज्ञात मोबाईलवरुन एका व्यक्तीने कॉल केला होता. यावेळी या व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून तिच्याविरुद्ध एक तक्रार प्राप्त झाली आहे. तिने लाखो रुपयांचे मनी लॉड्रिंग केले असून तिच्याविरुद्ध लवकरच अटकेची कारवाई होणार आहे असे सांगितले होते. ही कारवाई न करण्यासाठी त्याने तिला त्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोला असे सांगून तिचे कॉल दुसर्‍या व्यक्तीकडे ट्रान्स्फर केले होते. यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याने तिला स्काईप आयडी डाऊनलोड करण्यास सांगितले. कारवाईच्या भीतीने तिने स्काईप आयडी डाऊनलोड केले होते. तिच्यावर दबाव टाकण्यासाठी त्याने तिचे घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करण्यास सांगितले. यावेळी या व्यक्तीने तिच्या खात्यात काही रक्कम जमा झाली असून ती रक्कम फसवणुकीच आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल होणार असून तिला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते असे सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्याच्या सांगण्यावरुन विविध बँक खात्यात अकरा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर करुनही संबंधित तोतया अधिकारी तिच्याकडे आणखीन मागणी करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने स्थानिक पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी तपास करत होते.

हा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अनिल जैनला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी बँकेचे पासबुक आणि काही आक्षेपार्ह दस्तावेज जप्त केले आहे. सीबीआयसह इतर शासकीय यंत्रणेच्या नावाचा वापर करुन ही टोळी अनेकांना अटकेची धमकी देऊन त्यांची फसवणुक करत होती. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून ही टोळी संबंधित व्यक्तींना सुप्रिम कोर्टाचे बोगस कागदपत्रे पाठवून भीती घालत होती. अनिलने अशाच प्रकारे तक्रारदार महिलेला अटकेची धमकी देऊन तिच्याकडून अकरा लाख रुपये उकाळले होते. या पैशांतून त्याने नवी मुंबईत एका गाळ्यावर गुंतवणुक केली होती. या गाळ्याच्या नावावर त्याने बँकेत स्वतच्या बोगस कंपनीचे एक खाते उघडले होते. याच अकाऊंटमध्ये फसवणुकीची रक्कम जमा होत होती. त्यातील त्याचे कमिशन काढून तो उर्वरित रक्कम त्याच्या सहकार्‍यांना देत होता. या रक्कमेतून त्याने क्रिप्टो करन्सी करुन ती करन्सी विदेशात पाठवत असल्याचे उघडकीस आले आहे. याच चौकशीतून त्याच्या इतर सहकार्‍यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page